Join us

सत्तेची लालसाच नेत्यांना 'हे' करायला लावते, आदित्य ठाकरेंनी भाजपावर सोडला टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 3:12 PM

कोरोनाच्या महामारीवर कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही

मुंबई - भाजपानं आज ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन पुकारलं असून, मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या या आंदोलनावर महाविकास आघाडी सरकारकडून टीका होत आहे. पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही भाजपाच्या आंदोलनावर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. 

कोरोनाच्या महामारीवर कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करतंय, असं टीकास्त्रही फडणवीसांनी आंदोलनकरतेवेळी सोडलं आहे. 

भाजपाच्या या आंदोलनावर आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली आहे. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणं आहे. कोरोनाला विसरुन राजकारण प्रिय असल्याचं भाजपाने दाखवून दिलंय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एक फोटो शेअर केला आहे. तसेच, लहान मुलांना उन्हात उभं करुन त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. या मुलांच्या तोंडावर नीट मास्कही झाकण्यात आलेलं दिसत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लहान मुलांना घरात आणि सुरक्षित ठेवणे गरजेचं असताना, हे काय चाललंय? कोरोना को भुल गये पॉलिटीक्स प्यारा है... असे आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय. 

तसेच जगभरातील नागरिक सर्वकाही विसरुन कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढत आहे. मात्र, एका राजकीय पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी एक विश्विविक्रमच बनवला आहे. सध्या राजकारणात गुंतलेला जगातील एकमेव पक्ष असून भीती, तीरस्कार आणि विभाजनाची रणनिती या पक्षांकडून सुरु असल्याचं दिसत आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.  

दरम्यान, राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग तयार करून आणि काहींना प्रवक्ता करून सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय, पण ग्राऊंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रस्त्यावर फिरावं लागतं, सरकारी रुग्णालयात जागा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशातील २० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाभाजपाकोरोना वायरस बातम्या