मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता उद्धव दादूनंतर पुतण्या आदित्य ठाकरेनेही लक्ष्य केले आहे. ज्या पक्षाचे उमेदवार रिंगणात नाहीत, त्यांच्या सभांना महत्त्व नसते, अशी टीका आदित्य यांनी केली. आदित्य यांनी नाव न घेता मनसे आणि राज ठाकरेंना लक्ष्य केले. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती. तर, आज चक्क नालायक असे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा राज ठाकरेंच्या सभांची आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज ठाकरे सरकारवर हल्ला करत आहे. व्यासपीठावर थेट व्हीडिओ दाखवून सरकारच्या योजनांची राज यांच्याकडून पोलखोल करण्यात येत आहे. राज ठाकरेंनी भाजपासह आता, सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेलाही मतदान करु नका, असे म्हटले आहे. त्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी मनसेला टार्गेट केले. राज ठाकरेंचे नाव न घेता उद्धव यांनी मनसेवर टीका केली.
काही लोक या लोकसभा निवडणुकीत सभा घेऊन युतीला मत देऊ नका, असे आवाहन करत फिरत आहेत. युतीला मत द्यायचे नाही तर मग कोणाला मत द्यायचे, ते तरी सांगा, असे विचारल्यावर त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाही, त्यांच्या पक्षाची दिशा हरपली आणि दुर्दशा झाली, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मनसेवर केली. त्यानंतर, आता आदित्य ठाकरेंनीही आपल्या काकांवर बाण चालवले. संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहोल आहे. सगळीकडे धनुष्यबाण आणि कमळ दोन बटणं सोडून लोकं कोणतंही दुसरं बटणं दाबत नाहीत. तर, ज्या पक्षाचे उमेदवार रिंगणात नाहीत, त्यांच्या सभांना महत्त्व नसते असे म्हणत आदित्य यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले. ईशान्य मुंबईमधून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करून तिकिट मिळालेल्या मनोज कोटक यांच्यासाठी आदित्य यांनी रॅली काढून रोड शो केला, त्यावेळी ते बोलत होते.