महाविद्यालयातील निवडणुकांना आदित्य ठाकरेंचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:48 AM2019-03-25T02:48:45+5:302019-03-25T02:49:03+5:30

महाविद्यालयीन जीवनात राजकारणाचा अंतर्भाव करता कामा नये कारण तसे झाल्यास शिक्षण बाजूला राहून महाविद्यालयात केवळ राजकारणाच्या नावावर धिंगाणा होतो, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

 Aditya Thackeray's opposition to the college elections | महाविद्यालयातील निवडणुकांना आदित्य ठाकरेंचा विरोध

महाविद्यालयातील निवडणुकांना आदित्य ठाकरेंचा विरोध

Next

मुंबई : महाविद्यालयीन जीवनात राजकारणाचा अंतर्भाव करता कामा नये कारण तसे झाल्यास शिक्षण बाजूला राहून महाविद्यालयात केवळ राजकारणाच्या नावावर धिंगाणा होतो, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. एका यूट्युब वाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी तरुणांशी संवाद साधला़ त्या वेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
आदित्य म्हणाले, राजकारण केवळ निवडणुकीसाठी नसते. मतदान पाच वर्षांसाठी असते. मतदान केले नाही तर मधली पाच वर्षे फुकट जातात, त्यामुळे मतदान करणे गरजेचे आहे. शिवसेना व भाजपासारख्या समविचारी पक्षांनी एकत्र येणे हे अविचारी पक्ष एकत्र येण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. मेट्रो लोकांच्या चांगल्यासाठी आहे़ मात्र आरेची झाडे कापणे चुकीचे आहे़ त्यामुळे शिवसेनेने विरोध केला. सध्या वायफाय हॉटस्पॉट देऊ असे निवडणुकीच्या वचननाम्यात सांगितले जाते़ मात्र असाच विकास सुरू राहिला तर पुढील पाच-सात वर्षांत आॅक्सिजनचे हॉटस्पॉट देण्याची वेळ येण्याची भीती आहे, असे ते म्हणाले.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बनवताना पूर्वी साडेसहा हजार झाडे कापली जाणार होती़ आम्ही त्याला विरोध केला. आता जमिनीच्या खालून रस्ता बनवला जाणार आहे. त्यामध्ये एकसुद्धा झाड कापले जाणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांवर आली आहे.
राजकीय कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंदवणे हे चुकीचे आहे. राजकीय गुन्हे असतील तर उमेदवारी देताना त्याचा परिणाम होता कामा नये. राजकीय गुन्हे व खरोखरीचे गुन्हे यामध्ये फरक करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, ३० फूटपेक्षा कमी रस्ता असेल तर अ‍ॅस्फॉल्ट प्रकारचा रस्ता बनवावा लागतो. त्यावर खड्डे पडतात.
क्राँकिटचा रस्ता असेल तर खड्डा पडत नाही. देशातील विविध कायदे पाळण्यासाठी शिक्षण पूरक ठरते. सध्याची शिक्षणपद्धती पूर्णत: मोडीत काढण्याची गरज आहे. बेस्टचे खासगीकरण ही अफवा आहे. बेस्ट आमच्या मानाचा तुरा आहे. मुंबईतील नाइट लाइफ आवश्यक आहे.
पूल पडल्याप्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तपास सुरू आहे. तपासात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.
शिवसेना मराठीचा मुद्दा कधीही सोडणार नाही. महापालिकेतील निविदा प्रक्रियेसाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. राजकारणात आलो नसतो तर छायाचित्रकार झालो असतो. राजकारण करताना विविध समस्या सोडवण्याची संधी मिळते त्यामधून मिळणारे समाधान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आदित्य म्हणाले.

Web Title:  Aditya Thackeray's opposition to the college elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.