खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 12:51 PM2020-01-05T12:51:33+5:302020-01-05T12:53:06+5:30
आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
मुंबई - गेल्या आठवडाभरापासून तीन पक्षांच्या वाटाघाटीत रखडलेले राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. या खातेवाटपामध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आवडती खाती मिळाल्याने आनंद व्यक्त केला असून, सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
खातेवाटप झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ''मला पर्यावरण आणि पर्यटन अशी आवडती खाती मिळाली, याचा मला आनंद आहे. आता मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. माझ्यामते पर्यटनावर आपण संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था उभारू शकतो. सद्यस्थितीत महाराष्ट्रात पर्यटनवाढीस वाव आहे. गडकिल्ले, समुद्र किनारे यामुळे राज्यात पर्यटनवाढ होऊ शकते,''
दरम्यान, राज्य सरकारच्या आज झालेल्या खातेवाटपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:कडे सामान्य प्रशासन तसेच विधी व न्याय ही खाती ठेवली आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री, शिवसेनेचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात महसूल, तर अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील. सामाजिकदृष्ट्या दोन महत्त्वाच्या खात्यांपैकी आदिवासी विकास खाते काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य के. सी. पाडवी यांच्याकडे, तर सामाजिक न्याय खाते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविले आहे.