बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 02:10 PM2024-05-16T14:10:32+5:302024-05-16T14:13:35+5:30

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Aditya Thackerays response to criticism from the opposition on the issue of Sushma Andhare inclusion in Shiv Sena | बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं

बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं

Aditya Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ज्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली त्या अंधारे यांना पक्षात घेतलेल्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली होती. या टीकेला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "पक्ष फुटल्यानंतर आमच्यासाठी सगळ्यात कठीण काळ होता, त्या काळात सुषमा ताईंनी शिवसेनाप्रमुखांच्या पक्षासाठी प्रचार केलाय, हिंमत दाखवलीय, गल्लीगल्लीत गेल्यात, कोणत्या नेत्यांना त्यांनी अंगावर घेतलं हेही बघण्यासारखं आहे. गेल्या दीड वर्षांत सत्ता येईल, न येईल, मंत्रिपद मिळेल वगैरे न बघता दिवसरात्र मेहनत केलीय. आम्हीही काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात बोललोच होतो कधी काळी. पण, आज आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी काम करतोय," असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी 'लोकमत डिजिटल'ला दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे. 

आदित्य ठाकरे हे ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची चर्चा रंगत आहे. या चर्चेवरही आदित्य यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "मी सांगितलं होतं घटनाबाह्य मुख्यमंत्री राजीनामा देऊन जर वरळीतून लढणार असतील तर मीही आमदारकीचा राजीनामा देतो आणि वरळीतून आपण दोघे निवडणूक लढवू. तुम्हाला जर वरळीतून लढायचं नसेल तर मी ठाण्यातील तुमच्या मतदारसंघातून लढतो, असं मी त्यांना म्हटलं होतं."
 
कल्याण लोकसभेत कमकुवत उमेदवार दिला? 

कल्याण लोकसभ मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं नवखा उमेदवार दिल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा समाचार घेतला आहे. "ही चर्चा शिंदे गटाने का सुरू केली आहे ते मला माहीत नाही. कदाचित त्यांना वाटतं पैसा हेच सर्वस्व असतं. एक साधी महिला जी सर्वसामान्य घरातून येते ती जर आम्हीच तिथे डोक्यावर जो खासदार बसवला आहे, त्याच्याविरोधात लढली तर काय गैर आहे? सर्वसाधारण माणसाला असामान्य ताकद देणं, ही कायमच शिवसेनेची ओळख राहिली आहे. शिवसेनेनं अशा अनेक सामान्य लोकांना तिकीट देऊन निवडून आणलं, त्यांना पदं दिली, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, लोकसभा सभापतीही केलं. माझ्या आजोबांनी ही जी परंपरा सुरू केलीय तेच संस्कार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

घाटकोपर दुर्घटनेवर भाष्य

"मी रात्री दीड वाजता गेलो. पहिलं काम रेस्क्यू करणं हे असतं. त्यासाठी एक्सपर्ट लागतात. तिथे टुरिझम करण्यासाठी जायचं नसतं. गेल्या दोन अडीच वर्षांत अनेक मोठी होर्डिंग लागली आहेत. माहिम कॉजवे सगळे होर्डिंग्ज बघा. सगळ्यांच्या सीआरझेडच्या परवानग्या आहेत का बघा. हे सगळे कुणाचे? हे सगळे कधी आले आहेत? दुर्घटना होते, तेव्हा जबाबदारी घ्यायला लागते. कायद्याचा वचक असायला पाहिजे. महापालिकेने सहा महिन्यात अनेकदा नोटिसा देऊनही रेल्वेने ते काढायला लावलं नाही," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 
 
दरम्यान, "महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण भाजपाने सुरू केलं. लहानपणापासून बघत आलोय, कुणी कुठल्याही पक्षाचे असो, टोकाची टीका केली, तरी वैयक्तिक कुणाच्या मागे जाणं, फोनमध्ये घुसणं, सीसीटीव्ही लावणं हे एवढं घाण झालं नव्हतं. हे राजकारण सुधारावं लागेल. या लोकसभेत बदल घडेल. चिखलातच कमळ उमलतं, पण किती वेळ चिखलात राहणार आपण? " असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
 

Web Title: Aditya Thackerays response to criticism from the opposition on the issue of Sushma Andhare inclusion in Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.