Join us

आदित्य ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 12:47 PM

शिवसेनेनत दोन गट पडले असून मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार आणि आता पदाधिकारीही ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत

मुंबई - शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिलाय. आदित्य ठाकरेंचे शिलेदार आणि ठाकरे गटाच्या एका संपर्कप्रमुखाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख व सिनेट सदस्य, तसेच युवा सेनेचे विस्तारकच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. अॅड.वैभव थोरात यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

शिवसेनेनत दोन गट पडले असून मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार आणि आता पदाधिकारीही ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्या ८ महिन्यात अनेक ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेत नगरसेवकांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत शिवसैनिकांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे, ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला कौल देत शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदेंच्या पारड्यात टाकलं. तेव्हापासून, शिंदे गटातही मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. आता, ठाकरेंच्या युवा सेनेचे विस्तारकच शिंदे गटात दाखल झाले आहेत.  

अँड वैभव थोरात यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे व प्रशासकीय कामातील अनुभवी समजले जाणारे मारूती साळुंखे व मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे मारुती साळुंखे यांनीही काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यामुळे, ठाकरे गटाल कमकवूत करण्याचा, त्यांच्या पक्षातील पदाधिकारी आपल्या शिवसेनेत घेण्याचा प्रयत्न शिंदेंकडून सातत्याने होताना दिसून येत आहे.  

 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरेपिंपरी-चिंचवडआदित्य ठाकरे