‘इंडिया’च्या बैठकीचा खर्च काढणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:19 PM2023-08-31T14:19:35+5:302023-08-31T14:22:02+5:30
INDIA Alliance Meeting: इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या तयारीच्या खर्चाचा हिशेब मांडत शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
मुंबईत आजपासून होत असलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीकडे देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. या दरम्यान, या बैठकीसाठी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या तयारीच्या खर्चाचा हिशेब मांडत शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीचा खर्च विचारणाऱ्या शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मला वाटतं त्यांनी आधी सांगावं की, सुरतचा खर्च कुणी केला. गुवाहाटीचा खर्च कुणी केला होता. त्या चार्टर्ड प्लेनचा खर्च कुणी केला होता. जे पन्नास खोके आमदारांना दिले गेले, त्यांचा खर्च कुणी केला, याच्यावर लोकांनी बोलावं. दसरा मेळाव्याच्या सभेसाठी १० कोटी रुपये एसटीला दिले गेले होते, असं ऐकण्यात आलं होतं. त्यावेळी कुठलाही पक्ष नसताना हे पैसे कुठून दिले. याच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे. तो खर्च सरकारी खर्च होता की कुणाच्या खिशातून आला होता. की खोक्यांमधून आला होता, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी करण्यात आलेली जय्यत तयारी आणि होत असलेल्या खर्चावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. मंत्री उदय सामंत म्हणाले होते की, इंडिया आघाडीची बैठक १४-१५ तासांचा इव्हेंट आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो, असे आरोप केले गेले. कुणी कुठे कार्यक्रम करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुंबईतील जुन्या खुर्च्या या लोकांना नको होत्या. म्हणून ४५ हजारांची एक खुर्ची अशा ६५ खुर्च्या नवीन घेण्यात आल्या. त्यामुळे १४ तासांसाठी एका नेत्याला बसायला ४५ हजारांची खुर्ची घेतली जाते. त्यांना आमच्यावर बोलायचा अधिकार आहे का? असा सवाल उदय सामंत यांनी व्यक्त केला होता.
तसेच या बैठकीला येणाऱ्या नेत्यांसाठी ज्या ६५ खोल्या बुक केल्या आहेत, त्या लॉजिंग बोर्डिंगमधील नाही तर फाईव्ह स्टार हॉटेलमधील आहेत. मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था असलेल्या जेवणाच्या प्रत्येक ताटाची किंमत ४५०० हजार रुपये आहे. खोलीचं भाडं दिवसाला २५-३० हजार रुपये आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो, पक्षातील आमदार हॉटेलला राहिले तेव्हा आमच्यावर टीका केली गेली. आता १४ तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, असा दावा उदय सामंत यांनी केला होता.