लग्न, डेटिंगबद्दल विचारताच आदित्य ठाकरे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:37 AM2019-04-23T05:37:01+5:302019-04-23T06:45:34+5:30
युवासेनेच्या ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात युवावर्गाशी विविध प्रश्नांवर मनोगत
मुंबई : सध्या निवडणुकीच्या स्थळांची घाई सुरू आहे. त्यामुळे आधी निवडणुकीचे स्थळ, त्यानंतर बाकीचे... अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी युवावर्गाकडून लग्न, डेटिंग वगैरेबाबतचे प्रश्न टोलवले. त्यांच्या या उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून आदित्य संवाद हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत सोमवारी वरळी येथील एनएससीआय सभागृहात आदित्य ठाकरे यांनी युवावर्गाशी संवाद साधला. दरबारी स्टाईल लांबलचक घोषणा, तुतारी वगैरे ही शिवसेनेच्या सभांची खासियत. त्याला या कार्यक्रमात पूर्ण फाटा देण्यात आला होता. चकाचक स्टेज, रॅम्प वॉक पोडीयम, तरुणांना बसण्यासाठी खास गॅलरी, रॉक बँड, अर्ज भरून घेताना शिस्तबद्ध तरुणाई असा अगदी नवाच थाट या कार्यक्रमात पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायक राहुल वैद्य याची गाणीही झाली.
भाजपशी पुन्हा घरोबा झाला तसेच मनसेशी शिवसेनेची युती होणार का, या प्रश्नावर विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्यांशी आम्ही युती केली. ज्यांचे विचार सतत बदलतात त्यांच्याशी युतीचा विचारसुद्धा नसल्याचे सांगत भविष्यात मनसेशी युतीबाबतची शक्यता आदित्य यांनी फेटाळून लावली. या निवडणुकीत नवमतदाराची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावायला हवा, असे आवाहन आदित्य यांनी या वेळी केले.
या वेळी उपस्थितांनी महिला सुरक्षा, शिक्षण, आरोग्य आदी विषयांवर आदित्य यांना प्रश्न विचारले. राजकारणातील घराणेशाहीबाबत आलेल्या प्रश्नावर घराणेशाही असली तरी स्वत:च्या जीवावर, लोकांची कामे करून एखादा युवा राजकारणात येऊ शकतो. समाजाची कामे करून राजकारणात उतरणाऱ्यांना कोणीच अडवू शकत नाही, असे उत्तर आदित्य यांनी दिले.
मुंबईच्या लाइफबाबत सकारात्मक
मुंबईसाठी नाइट लाइफ , रूफ टॉप पॉलिसी, राज्यातील प्लॅस्टिकबंदी आदी बाबी कशा महत्त्वाच्या आहेत, हेही आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले. तसेच मराठी शाळांचा प्रश्न, आऊटडेटेड होत चाललेल्या केजी टू पीजीमधील अभ्यासक्रमाबद्दलही आदित्य यांनी आपली मते व्यक्त केली.