आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आता कामगार वर्गाची धुरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:02 AM2018-04-28T03:02:39+5:302018-04-28T03:02:39+5:30

भारतीय कामगार सेनेत वर्णी : कामगार सेनेवर अंकुश ठेवण्यासाठी निवड?

Aditya Thakre's shoulder's axle now! | आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आता कामगार वर्गाची धुरा!

आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आता कामगार वर्गाची धुरा!

googlenewsNext

चेतन ननावरे ।
मुंबई : आतापर्यंत युवा आणि उच्चभ्रू वर्गाचे प्रश्न मांडणारे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आता कामगार वर्गाच्या प्रश्नांवर भांडताना दिसणार आहेत. भारतीय कामगार सेनेने वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात गुरुवारी आयोजित केलेल्या वार्षिक कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, कामगार वर्गाची धुरा सांभाळण्याची तयारी दर्शविली आहे.
भारतीय कामगार सेनेचे प्रमुख सल्लागार म्हणून सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काम पाहत आहेत. त्या खालोखाल स्पेशल नॉमिनी म्हणून आदित्य यांची निवड झालेली आहे. कामगार सेनेवर अंकुश ठेवता यावा, म्हणून ही निवड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कामगारांसंबंधित कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष देण्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ नसल्यास, आता तो प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आदित्य यांची असणार आहे. सध्या भारतीय कामगार सेनेच्या राज्यातील ३ हजार युनिट्समध्ये युनियन आहेत. त्याचे १५ लाख सभासद असून, या सर्व कामगारांची जबाबदारी आता आदित्य यांच्याकडे देण्यात आली आहे. सर्व कामगारांना कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्यामार्फत आदित्यपर्यंत पोहोचता येणार आहे.
आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची निवड केल्याची जोरदार चर्चा कामगार वर्गात आहे. कामगार सेनेचा आवाका राष्ट्रीय पातळीवर वाढविण्याचे आव्हान आदित्य यांना देण्यात आलेले आहे. सध्या तरी राष्ट्रीय पातळीवर भारतीय कामगार सेना महासंघ म्हणून ६ ते ७ राज्यांत शिवसेनेची ओळख आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी संलग्न भारतीय मजदूर संघ, इंटक, आयटक आणि सीटू अशा डाव्या पक्षांच्या संघटनांमध्ये नोंद असलेल्या कामगारांना, आपल्याकडे वळविण्याचे आव्हान भारतीय कामगार सेना महासंघासमोर आहे.

कामगार मेळाव्यात होणार घोषणा
स्पेशल नॉमिनी म्हणून आदित्य यांची घोषणा कामगार सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात होणार आहे. सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी २७ जुलैला कामगार सेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा मानस आहे. या मेळाव्यात राज्यातील ५० हजार कामगार उपस्थित राहतील. शिवसेना पक्षाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विशेष मेळावा असेल. त्यात २०१९ सालच्या निवडणुकीबाबतही महत्त्वाची घोषणा करून, कामगार सेनेच्या प्रत्येक युनिटमधील पदाधिकाऱ्याला कार्यरत केले जाणार आहे.

दादरमध्ये कार्यालय, तर खोपोलीला प्रशिक्षण वर्ग
कामगारांचा वापर मोठ्या संख्येने राजकारणात करण्यासाठी कामगार सेनेने कंबर कसली आहे. त्यासाठी दादरमध्ये ८ कोटी रुपयांचे कार्यालय, तर खोपोलीमध्ये दीड एकर जागा प्रशिक्षण वर्गासाठी खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत कार्यकर्त्यांचे मोठे जाळे कामगार सेनेच्या माध्यमातून शिवसेना उभारताना दिसेल.

Web Title: Aditya Thakre's shoulder's axle now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.