आदिवासी महिलांच्या दैनेचे विधानसभेत पडसाद; ‘लोकमत’ने उठवला होता आवाज, विरोधकांचा सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 05:40 AM2023-07-27T05:40:43+5:302023-07-27T05:41:04+5:30
दोन्ही घटनांबाबत ‘लोकमत’ने मंगळवार, २६ जुलैच्या अंकातून आवाज उठवला होता.
मुंबई : इगतपुरी तालुक्यात वनिता भाऊ भगत या गरोदर महिलेचा मृत्यू आणि मोखाडा (जि.पालघर) येथील नऊ महिन्यांची गर्भवती सुरेखा लहू भागडे हिला नदीच्या तुडुंब प्रवाहातून लाकडावर बसवून पार केल्याच्या घटनांचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. या दोन्ही घटनांबाबत ‘लोकमत’ने मंगळवार, २६ जुलैच्या अंकातून आवाज उठवला होता.
काँग्रेसचे नाना पटोले यांनी आदिवासी महिलेच्या मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्ताव स्वीकारावा आणि राज्याच्या कर्जासह आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी केली. शासनाने निवेदन करावे, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. मात्र, त्यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला.
इगतपुरीमध्ये महिलेचा मृत्यू झाला, कारण डॉक्टर उपलब्ध नव्हते. आदिवासी विभागाला बजेट मिळत नाही. पालघर मुंबईपासून किती अंतरावर आहे, इगतपुरी किती अंतरावर आहे? पण सुविधा उपलब्ध होत नाहीत. एका मातेचा मृत्यू झालेला आहे. म्हणून कामकाज थांबवून या विषयावर चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार या विषयावर निवेदन करेल आणि काही कमतरता असतील, तर त्याही दूर केल्या जातील, असे आश्वासन दिले. पण, त्यानंतरही या विषयावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. अध्यक्ष नार्वेकर यांनी आपण या विषयावरील स्थगन प्रस्ताव सदनातच नाकारलेला आहे आणि तरीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विषय मांडू दिला असून सरकारला निवेदनही करायला सांगितले आहे, असे स्पष्ट केले.