मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:10 AM2019-09-24T04:10:26+5:302019-09-24T04:10:30+5:30

शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; शिक्षक संंघटनांच्या मागणीची दखल

Adjustment of additional teachers in Mumbai only in Mumbai | मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच

मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच

Next

मुंबई : मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करण्याबाबत तसेच २०१९ व २०२० ची संचमान्यता स्थगित करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. १८ सप्टेंबर रोजी यासंबंधी परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले असून आपले समायोजन नक्की कोठे होणार या भीतीने शिक्षक-शिक्षकेतर चिंताग्रस्त होते, शिवाय महिला शिक्षकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. या परिपत्रकामुळे मुंबईतील शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील शिक्षक संच मान्यतानुसार अतिरिक्त ठरल्यास शिक्षकांचे मुंबईबाहेर ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी समायोजन करण्यात येणार होते. शिक्षक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाणे-येणे त्रासदायक ठरत होते. शिक्षकांचे मुंबई विभागातच, नजीकच्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे, ही मागणी अनेक शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदारांकडून लावून धरण्यात आली होती. जिल्हा समायोजनेच्या अनुषंगाने जो शिक्षकवर्ग धास्तावलेला होता, विशेषत: महिला शिक्षकवर्ग या परिपत्रकामुळे निर्धास्त होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी दिली.

आचारसंहितेपूर्वी निर्देश देण्याच्या सूचना
परिपत्रकातील सर्व सूचनांचे पालन केले जावे व आचारसंहितेपूर्वी सर्व निर्देश दिले जावेत, असे शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईबाहेर समायोजनाची सक्ती करू नये, जेथे सहज जाणे शक्य आहे अशा ठिकाणीच समायोजन करावे. पालघर व रायगड ठाणे येथे अतिदुर्गम भागात मुंबईतून पाठविलेल्या शिक्षकांना परत येण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मुंबईत ८५० आणि अन्य विभागात १०३५ शिक्षक अतिरिक्त आहेत. यामध्ये स्वच्छेने मुंबई विभागाबाहेर जाणाऱ्यांना जाऊ देण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे.
मुंबई विभागात रिक्त जागा व वाढीव पदे यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे सर्वांचे समायोजन लगेचच होणार नाही. परंतु जशी जशी पदे रिक्त होतील तसे रिक्त जागांवर समायोजन होईल. परंतु कोणाचाही पगार बंद होणार नाही, अशी सूचना सर्व अधिकाºयांना केली आहे. खासगी अनुदानितमधून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असे समायोजन रोष्टर बघून कायमस्वरूपी करता येईल. जेथे कायमस्वरूपी समायोजन करता येणार नाही, तेथे तात्पुरते पाठवले जाईल, मात्र वेतन मूळ शाळेतून निघेल.

Web Title: Adjustment of additional teachers in Mumbai only in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.