समायोजन झाले, पण वेतन नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:32 AM2017-12-28T04:32:09+5:302017-12-28T04:32:18+5:30
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट अद्यापही सुरूच आहे. उत्तर विभागांतून पश्चिम विभागात समायोजन होऊन दोन महिने झाले, तरी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू झाले नसल्याची बाब समोर आली आहे.
मुंबई : मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट अद्यापही सुरूच आहे. उत्तर विभागांतून पश्चिम विभागात समायोजन होऊन दोन महिने झाले, तरी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आर्थिक भुर्दंड शिक्षकांना सोसावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन तत्काळ सुरू करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत मुंबई शिक्षण उपसंचालक व संचालकांकडे तक्रार केली आहे. मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी आॅक्टोबर महिन्यात शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उत्तर विभागातून पश्चिम विभागात शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे वेतन समायोजन झालेल्या शाळेमध्ये तयार करण्यात आले. मात्र शालार्थ प्रणालीत अडचणी आल्यामुळे वेतन मिळण्यास उशीर होत असल्याचे कारण शिक्षण निरीक्षक पश्चिम कार्यालयातून देण्यात येत आहे. शिक्षण निरीक्षक कार्यालयाने शिक्षकांचे वेतन सुरू होण्याबाबत व शालार्थ अडचणी दूर करण्याबाबत तातडीने पाठपुरावा करणे आवश्यक होते. मात्र दोन महिने उलटल्यावरही शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत असून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
>गृहकर्ज, विम्याचे हप्ते भरण्यास दिरंगाई
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गृहकर्जाचे, विम्याचे हफ्ते भरण्यास दिरंगाई होत असल्याने संबंधित बँक व कंपन्यांकडून शिक्षकांवर दंड आकारला जात आहे. त्यामुळे शिक्षण निरीक्षक कार्यालयाने तातडीने कार्यवाही करून शिक्षकांचे वेतन सुरू करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.