मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता मुंबईतच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:29 AM2019-09-21T06:29:39+5:302019-09-21T06:29:44+5:30
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करण्याबाबत, तसेच २०१९ व २०२० ची संचमान्यता स्थगित करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
मुंबई : मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करण्याबाबत, तसेच २०१९ व २०२० ची संचमान्यता स्थगित करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे मुंबईतील शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील शिक्षक संच मान्यतानुसार अतिरिक्त ठरल्यास शिक्षकांचे मुंबईबाहेर ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी समायोजन करण्यात येणार होते. शिक्षक, कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाणे-येणे त्रासदायक ठरत होते. शिक्षकांचे मुंबई विभागातच, नजीकच्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे, ही मागणी अनेक शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदारांकडून करण्यात येत होती. जिल्हा समायोजनेच्या अनुषंगाने जो शिक्षकवर्ग धास्तावलेला होता, विशेषत: महिला शिक्षकवर्ग या परिपत्रकामुळे निर्धास्त होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी दिली.
परिपत्रकातील सर्व सूचनांचे पालन केले जावे व आचारसंहितेपूर्वी सर्व निर्देश दिले जावेत, असे शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईबाहेर समायोजनाची सक्ती करू नये, जेथे सहज जाणे शक्य आहे अशा ठिकाणीच समायोजन करावे. पालघर व रायगड ठाणे येथे अतिदुर्गम भागात मुंबईतून पाठविलेल्या शिक्षकांना परत येण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मुंबईत ८५० आणि अन्य विभागात १०३५ शिक्षक अतिरिक्त आहेत. यामध्ये स्वेच्छेने मुंबई विभागाबाहेर जाणाऱ्यांना जाऊ देण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे.