Join us

‘मेक इन इंडिया’मुळे अडकला हार्बरचा ब्लॉक

By admin | Published: February 10, 2016 1:03 AM

हार्बर मार्गावर बारा डबा लोकल सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून येत्या शुक्रवारपासून तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र, या ब्लॉकदरम्यानच मुंबईत ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम होणार

मुंबई : हार्बर मार्गावर बारा डबा लोकल सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून येत्या शुक्रवारपासून तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र, या ब्लॉकदरम्यानच मुंबईत ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम होणार असून, या भव्य कार्यक्रमासाठी एक दिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोणताही गोंधळ उडू नये, यासाठी ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या संदर्भात अखेरचा निर्णय बुधवारी घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. सीएसटीत हार्बर मार्गावर बारा डब्यांच्या कामासाठी महत्त्वाचा असा विशेष ब्लॉक १२ ते १३ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला. यात स्टेबलिंग लाइन काढणे, प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची लांबी वाढविणे आणि क्रॉस ओव्हर मार्गाचे काम केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, हार्बर मार्गावर बारा डबा लोकल चालविणे शक्य होणार आहे. मात्र, हा ब्लॉक होत असतानाच, १३ फेब्रुवारीपासून मुंबईत ‘मेक इन इंडिया’चा भव्य कार्यक्रम सात दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. यात उद्योजक, तसेच विविध देशांचे प्रतिनिधी व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही दाखल होणार असल्याने, ब्लॉकदरम्यान कोणताही गोंधळ उडू नये, यासाठी विशेष ब्लॉकच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. हा ब्लॉक पुढील आठवड्यात घेण्याचा विचार केला जात आहे. यावर अंतिम निर्णय बुधवारी होणार असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)