Join us

विलगीकरणात असलेल्या व्यक्तींवरही प्रशासनाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 4:24 AM

कोरोना चाचणी सक्तीची : संसर्ग राेखण्यावर भरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आहे. दिलासादायक ...

कोरोना चाचणी सक्तीची : संसर्ग राेखण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आहे. दिलासादायक बाब म्हणजे, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता लवकरच कोरोना प्रतिबंधक लस दाखल होणार आहे. शहर, उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना रुग्णांसह विलगीकरणातील व्यक्तींवरही पालिका प्रशासनाची करडी नजर असल्याचे दिसून येते आहे.

मुंबई ९७५ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून, ५ हजार ९६६ घरगुती अलगीकरणात आहेत. आतापर्यंत ४१ लाख १५ हजार ५०० व्यक्तींनी घरगुती अलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. राज्यात ५ लाख १२ हजार ५८७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ४ हजार ४०३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

सध्या मुंबईत संस्थात्मक अलगीकरण किंवा घरगुती अलगीकरणात असताना कोरोना चाचणी सक्तीची असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ही चाचणी पालिका केंद्रांमध्ये किंवा खासगी केंद्रांमध्ये कऱण्याची मुभा आहे. ज्या कुटुंबांकडे किंवा झोपडपट्टीच्या परिसरात घरगुती अलगीकरण शक्य नाही, अशा स्थितीत पालिकेच्या वतीने संस्थात्मक अलगीकरण करण्यात येते, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

* एकत्रित प्रयत्नांचा परिणाम

सध्या मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून, प्रतिबंधात्मक धोरणाचा मुख्य भर, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, विशिष्ट परिघात नियंत्रण कामे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेत शोध, प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण, गंभीर रुग्णांचे प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन यावर आहे. रुग्णालयातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचा दर वाढल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

एकूण रुग्णसंख्या - २ लाख ९० हजार ६३६

सध्या उपचार घेणारे - १३ हजार ११२

* अलगीकरणातील रुग्ण

- घरगुती अलगीकरण - ५ हजार ९६६

- संस्थात्मक अलगीकरण - ९७५