लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिनांक २७ जानेवारीपासून शाळा सुरू होतील, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र, महापालिका प्रशासन अजूनही शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमात आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणावर असेल? किती शिक्षकांचे लसीकरण केले जाणार आहे? याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी शिक्षण समिती सदस्यांनी गुरुवारी केली.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी २० कोटी रुपयांचे मास्क खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत पालिका प्रशासनाने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांनी गुरुवारी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.
शैक्षणिकदृष्ट्या कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना महापालिका प्रशासनाकडून शिक्षण समितीला अंधारात ठेवले जात आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे का? विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची मते घेतली आहेत का?, शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार का? त्याबाबत महापालिका प्रशासनाने कोणती पूर्वतयारी केली आहे, असे प्रश्न नगरसेवकांनी बैठकीत उपस्थित केले.