Join us

२६ जुलैच्या पुरानंतरही प्रशासन ढिम्मच, मुंबईकरांनीच केली एकमेकांना मदत 

By अोंकार करंबेळकर | Published: August 30, 2017 1:53 PM

२६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुरानंतर मुंबईचे प्रशासन व व्यवस्था पुरासारख्या संकटाशी लढण्यात किती अपुरी पडते याचं चित्र स्पष्ट झालं होतं. मंगळवारी २९ आँगस्ट रोजी झालेल्या पावसाने त्या दिवसाची पुन्हा आठवण करुन दिली.

मुंबई, दि. ३० - २६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुरानंतर मुंबईचे प्रशासन व व्यवस्था पुरासारख्या संकटाशी लढण्यात किती अपुरी पडते याचं चित्र स्पष्ट झालं होतं. मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने त्या दिवसाची पुन्हा आठवण करुन दिली. पाऊस जास्त असला तरी अशा संकटकाळी मुंबईकराला १२ वर्षांपुर्वीच्या पावसातून प्रशासनाने फार काही धडे घेतले नसल्याचे जाणवले. वाढती लोकसंख्या , तिचा व्यवस्थेवर येणारा ताण आणि सतत पडणारा मुसळधार पाऊस ही खास कारण दिली जात असली तरी जनजीवन विस्कळीत होण्यावरुन आपली शहराची व्यवस्था आजही सक्षम नसल्याचे मुंबईकरांना प्रकर्षाने जाणवलं. दरम्यान गेल्या चोवीस तासांमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यानंतर आता बुधवारी काही अंशी मुसळधार पावसापासून मुंबईकरांचा सुटका होऊ शकते, असा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणा-या खासगी संस्थेने वर्तविला आहे. 

मंगळवारच्या पुरामध्ये प्रशासनापेक्षा लोकांनीच आपल्या १२ वर्षांपुर्वीच्या अनुभवामुळे स्वतःची व इतरांची काळजी घेणं पसंत केलं, त्यासाठी प्रशासनापेक्षा स्वतःच पावलं उचलून सुरक्षित राहणं त्यांनी निवडलं. कित्येक गणपती मंडळांनी आपली दारं लोकांसाठी खुली केली, काहींनी लोकांच्या खाण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर काही महाविद्यालये, सिद्धीविनायक गणपकी मंदिर येथे राहण्याचीही व्यवस्था केली गेली. सोशल मीडियावरही लोकांनी इतरांना मदतीचा हात देऊ केला. कालच्या पावसात मुंबईबाहेरुन शहरात येणार्या लोकांच्या स्थितीचा प्रश्नही पुन्हा वरती आला आहे. दररोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सात यावेळेत शहराची संख्या काही लाखांनी वाढते, याला फ्लोटिंग पाँप्युलेशन म्हणतात. हे लोक शहराबाहेरुन येत असले तरी त्यांच्यामुळेच शहर गतिमान राहात असते किंबहुना ही उपनगरे म्हणजे मुंबईच झाली आहे. संकटकाळात या लोकांनी कोठे जायचे याची कोणतीही कायमची व्यवस्था आजही आपण केलेली नाही. ही लोकसंख्या निसर्गाच्या भरवशावर पुन्हा उपनगरी गाड्या कघी सुरु होणार याची वाट पाहात स्थानकांमध्ये अडकून राहाते. अशा अनेक प्रश्नांवर आणि कालच्या पावसावर सुलक्षणा महाजन, नितिन सरदेसाई, भरत दाभोळकर, अच्युत राईलकर, लक्ष्मीकांत देशपांडे यांनी लोकमत कडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अधिक वाचा ऑनलाइन लोकमत 

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकारमुंबई महानगरपालिका