Join us

उत्पादन शुल्क कार्यालयाचा कारभार लोखंडी कंटेनर्समधून; साप, अजगर व डासांचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 1:44 AM

वांद्रे (पूर्व) येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ओ, पी आणि क्यू असे तीन विभाग होते व त्यांची तीन मोठी कार्यालये होती.

मुंबई : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये साप, अजगर, डास यांच्या विळख्यात असलेल्या लोखंडी कंटेनर्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज अशी नवीन वास्तू मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ उभारली असून, ती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र उपनगर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या कंटेनर्समध्ये आपल्या कार्यालयात विभागाचा गाडा हाकत आहेत.

वांद्रे (पूर्व) येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ओ, पी आणि क्यू असे तीन विभाग होते व त्यांची तीन मोठी कार्यालये होती. २०१७ मध्ये ही कार्यालये उड्डाणपुलासाठी तोडली. त्यानंतर लोखंडी कंटेनर्समध्ये येथेच मोकळ्या जागेत ही तीन कार्यालये सुरू होती. तेव्हापासून लोखंडी कंटेनर्समधून कार्यालयाचा गाडा हाकला जात आहे. सध्या तीन कार्यालयांपैकी ‘पी’ विभाग वांद्रे शासकीय वसाहतीत दोन खोल्यांमध्ये तर ‘ओ’ विभाग आणि ‘क्यू’ कार्यालय येथेच लोखंडी कंटेनर्समध्ये सुरू आहे. बरीच वर्षे झाल्यामुळे आता कंटेनर कार्यालयाचीसुद्धा दुरवस्था झाली आहे.

 ही कार्यालये नागरी वसाहतीपासून लांब असून, जवळच मिठी नदीचे पात्र असल्याने झुडपे खूपच आहेत. २०१२ मध्ये येथील लोखंडी कटआउटची फ्रेम पडून येथील एच. एम. शेख नावाचे अधिकारी आणि एक कर्मचारी जखमी झाले होते.

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ओ, पी आणि क्यू असे तीन विभाग येथे आहेत. दोन कार्यालये तात्पुरती लोखंडी कंटेनरमध्ये आहेत. लवकरच त्यांना नवीन जागेत स्थलांतरित करण्यात येईल.- सुनील चव्हाण, सहआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

टॅग्स :मुंबई