लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील प्रशासकीय कारभार जलद गतीने व्हावा. त्या रुग्णालयातील अधिष्ठातांना मदत व्हावी या हेतूने महापालिका प्रशासनाने या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून सहायक आयुक्तांची नेमणूक केली आहे. अशा पद्धतीने रुग्णालयात सहायक आयुक्तांची नेमणूक केली आहे. मात्र, या नियुक्तीमुळे डॉक्टर वर्गात अस्वस्थता पसरली आहे. सुरुवातीच्या काळात सहायक आयुक्त हे केईएम रुग्णालयात बसून पाचही महाविद्यालयांचे काम पाहणार आहेत.
महापालिकेच्या अधिपत्याखाली लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय (सायन रुग्णालय), सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय (केईएम रुग्णालय), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय (कूपर रुग्णालय), टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालय (नायर रुग्णालय), नायर दंत रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय, ही महाविद्यलये आहेत. या रुग्णालयांत मुंबईतूनच नव्हे, तर राज्यभरातून रुग्ण येत असतात. या सध्याच्या घडीला या पाचही रुग्णालयांवर रुग्णसेवेचा मोठा ताण आहे. तसेच या महाविद्यालयांत अधिष्ठाता हे पद सर्वोच्च असून, रुग्णालयातील प्रत्येक गोष्टीस त्यांना जबाबदार धरले जाते.
रुग्णसेवा, विद्यार्थी घडविणे, रुग्णालयातील अध्यापक वर्गापासून ते चतुर्थ श्रेणीतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन, प्रशासकीय कारभार, इंजिनिअरिंग कामापासून ते रुग्णालयाच्या इमारतीची देखभालपर्यंतच्या सर्व कामांत अधिष्ठाता यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांना नियमितपणे विविध कामांत लक्ष घालावे लागते. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. खरे तर त्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि रुग्ण सेवा या गोष्टी कटाक्षाने बघणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांना प्रशासनाचे पूर्ण काम पाहावे लागते. त्यांना या कामात मदत व्हावी यासाठी महापालिकेने या रुग्णालयात सहायक आयुक्तांची नेमणूक केली आहे. सध्या या पदावर जी नॉर्थ येथील वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांना या कामाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. वॉर्डाचे काम सांभाळून त्यांनी हे काम पाहणे अपेक्षित आहे.