Join us

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज, रुग्णालये, कोविड केंद्र यांचे ऑडिट करण्याची सूचना  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:42 AM

Coronnavirus in Maharashtra: दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट करण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्या.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट करण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्या. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करून त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही नगरविकासमंत्र्यांनी दिले.

कोविड-१९ चा नवा घातक व्हेरिएंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात, सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोर पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून, आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, असा इशारा शिंदे यांनी या बैठकीत दिला. कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट तातडीने करून घेण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत, रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

मास्कची सक्ती करा

सामान्य नागरिकांकडून मास्क वापरण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले असून, अनावश्यक गर्दीवरदेखील नियंत्रण आणण्याची गरज आहे. शारीरिक अंतराची मर्यादा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या दृष्टीने सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी जनजागृती करण्याच्या सूचना देऊन प्रसंगी क्लीनअप मार्शलसारखे उपक्रम राबवून महापालिका, नगरपालिका स्तरावर मास्कची सक्ती करण्यास शिंदे यांनी सांगितले.

परदेशातून येणाऱ्यांची माहिती

मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरिएंट सापडलेल्या १० देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांकडून सहायक आयुक्तांच्या माध्यमातून दिली जाईल. अति जोखमीच्या देशांतून गेल्या १४ दिवसांतून आलेल्या प्रवाशांचीदेखील यादी विमानतळाकडून घेण्यासही शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत दक्षता

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या बैठकीत संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार असून, त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृहअलगीकरण करण्यात येणार नाही, असे सांगून दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला, तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई