Join us

सोनींच्या निधनाने प्रशासन हळहळले

By admin | Published: June 13, 2015 4:23 AM

महापालिकेचे माजी आयुक्त व केंद्र शासनाच्या सेवेत असणारे सनदी अधिकारी सुनील सोनी यांचे दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

नवी मुंबई : महापालिकेचे माजी आयुक्त व केंद्र शासनाच्या सेवेत असणारे सनदी अधिकारी सुनील सोनी यांचे दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पालिकेचा पाणीप्रश्न सोडविणारे मोरबे धरण, आरोग्य सुविधा, संगणकीकरण व इतर विकासकामांची पायाभरणी करणारा अधिकारी हरपल्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने हळहळ व्यक्त केली आहे. शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणारे सुनील सोनी महापालिकेमध्ये जून २००२ ते जून २००३ या काळात आयुक्त होते. एक वर्षाच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे शहराच्या पुढील पन्नास वर्षांपर्र्यंतच्या समस्या सुटल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई एकमेव महापालिका ठरली. मोरबे धरणामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणी मिळल्यामुळे पुढील ५० वर्षे पाणीप्रश्न भेडसावणार नाही. पण हे धरण विकत घेण्याची पायाभरणी त्यांच्या काळातच झाली. पालिकेच्या कामकाजाचे संपूर्ण संगणकीकरणाची सुरवात त्यांनी करून दिली. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे काम वेळेत व चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. पालिकेच्या प्रत्येक कामावर त्यांचे बारीक लक्ष होते. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून पाहणी करण्यावर त्यांचा भर होता. वाशी ते तुर्भे नाल्याचे काम सुरू असताना स्वत: पायपीट करून पाहणी केली होती. आयुक्तच स्वत: कामाची पाहणी करत असल्यामुळे इतर अधिकारी व ठेकेदार कामाचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष देत. बेस्टने एनएमएमटीला दादरला बस उभी करण्यास मनाई केल्यानंतर बेस्टच्या अधिकाऱ्यांशीही तात्विक वाद घातला होता. सिडकोमध्येही पालिकेच्या हितासाठी ते आग्रही होते. त्यांच्या निधनामुळे पालिकेतील अधिकारी व लोकप्रतिनिधींनीही दु:ख व्यक्त केले.