Join us

सेंट जॉर्जेस रुग्णालयातही लिव्हर ट्रान्सप्लांट, क्लिनिकसाठी प्रशासकीय मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:59 AM

वैद्यकीय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाने खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिव्हर क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातही आता लिव्हरशी संबंधित शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत. ४ कोटी ३० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

काही महिन्यांपासून शासकीय रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र, शस्त्रक्रिया कुठे कराव्यात, त्यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ कसे निर्माण करायचे? त्यासाठीचा खर्च या सर्वांची जुळवाजुळव करावी लागणार होती. त्यासाठी जे.जे.समूह रुग्णालयाच्या अख्त्यारीत येणाऱ्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाची निवड केली होती. कारण येथे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.सुरुवातीच्या प्रस्तावात केवळ लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी चर्चा झाली होती. मात्र, प्रस्ताव अंतिम करतेवेळी लिव्हरशी निगडित आजार, तसेच ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेव्यतिरिक्त इतरही शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात खासगी रुग्णालयातील डॉक्टर येथे येऊन काही शस्त्रक्रिया करणार आहेत. या रुग्णालयात शल्यचिकित्सकांनाही ते प्रशिक्षण देणार आहेत. 

लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्षाची गरज असून, संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने सेंट जॉर्जेस रुग्णालयाची जागा योग्य असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील एका खासगी रुग्णालयात लिव्हरशी संबंधित आजारावर संपूर्ण उपचार, तसेच लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे या रुग्णलयाची निवड केली आहे. संबंधित डॉक्टरांसोबत काही बैठकाही झाल्या आहेत. त्यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालयाची पाहणीही केली आहे.

सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिव्हर क्लिनिक सुरू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयात लिव्हरशी संबंधित आजारावर उपचार मिळणार आहेत. खासगी रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेचा मोठा खर्च येत असतो. त्या तुलनेने शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया शासकीय योजनेत कशा पद्धतीने बसविता येईल, यावरसुद्धा विचार सुरू आहे. विभागाचे आयुक्त त्यावर काम करीत आहेत.- हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल