कौतुकास्पद! शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्याने पटकावले सुवर्ण पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:10 AM2021-09-10T04:10:33+5:302021-09-10T04:10:33+5:30

सीमा महांगडे मुंबई गरीब घरातून आलेल्या आणि कौशल्य विकासासाठी आयटीआय अभ्यासक्रम निवडलेल्या मुंबईतील शासकीय आयटीआयमधील जुनैद अडनेवाला हा स्किल ...

Admirable! Government ITI student wins gold medal | कौतुकास्पद! शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्याने पटकावले सुवर्ण पदक

कौतुकास्पद! शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्याने पटकावले सुवर्ण पदक

Next

सीमा महांगडे

मुंबई

गरीब घरातून आलेल्या आणि कौशल्य विकासासाठी आयटीआय अभ्यासक्रम निवडलेल्या मुंबईतील शासकीय आयटीआयमधील जुनैद अडनेवाला हा स्किल कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत वेब टेक्नॉलॉजी या विभागात कोविड-१९ व्हॅक्सिनेशनसाठी नोंदणीचे संकेतस्थळ बनविण्याच्या विषयात त्याने हे सुवर्णपदक पटकाविले आहे.

कोविड-१९ च्या काळात लसीकरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लसीकरणाचे डोस सोप्या पद्धतीने नोंद करण्याची लोकांची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना या विषयावर प्रकल्प बनविण्याचे आव्हान देण्यात आले. मुंबईतील शासकीय आयटीआय संस्थेमध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स या अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या जुनैदची मेहनत पाहून त्याचे शिल्प निदेशक हेमंत खाने यांनी त्याला प्रोत्साहन देत या स्पर्धेत उतरविले आणि त्याची निवड होऊन तो ही स्पर्धा जिंकला. अवघ्या २ दिवसांत जुनैदने या संकेतस्थळाची निर्मिती केली. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना फक्त हार्डवेअर पुरते मर्यादित न राहिल्याने आयटीआयमधून विविध कौशल्य शिक्षण आम्हाला घेत आहे. त्यातूनच आमचा विकास होत असल्याची प्रतिक्रिया जुनैदने दिली. दरम्यान, आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी साधारणतः गरीब घरातून येत असल्याने लवकरात लवकर कोर्स संपवून नोकरी करणे हा त्यांचा हेतू असतो; मात्र कालावधीतही त्यांना अधिकाधिक कौशल्याधारित शिक्षण देणे हा आमचा हेतू असल्याचे हेमंत खाने यांनी सांगितले.

जुनैदने आता एक वर्षाचा आयटीआयमधील अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःच्या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी करण्यात येणार असल्याची माहिती त्याने दिली. शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा निकाल ५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील २६३ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील १३२ युवक-युवतींना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक मिळाले आहे.

कोट

आयटीआयमधील १ वर्षाच्या अभ्यासक्रमाने जुनैदसारख्या होतकरू विद्यार्थ्याला राज्य कौशल्य स्पर्धेसारखे व्यासपीठ मिळत असल्याने आम्हाला निश्चितच अभिमान आहे. विशेष म्हणजे या कोविडनंतरच्या काळात प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगाराची संधी आयटीआयमधून मार्गदर्शन घेऊन निश्चित करत आहेत.

दिगंबर दळवी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय.

Web Title: Admirable! Government ITI student wins gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.