Join us

अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश संमती पत्राअभावी रद्द; पालक हवालदिल, वर्ष वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 7:53 AM

दरम्यान, मुंबई उपसंचालक कार्यालयाअंतर्गत ८४३ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली. तेथे असे काहीच घडले नाही

मुंबई : कन्सेंट फॉर्म (संमती पत्र) नसल्याने अकरावीच्या ६५ विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश रद्द करण्यात आले. चेंबूर येथील एन.जी. आचार्य आणि डी.के. मराठे कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घडला. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यातील अखेरचे ३ ते ४ दिवस शिल्लक असताना महाविद्यालयाने प्रवेश रद्द झाल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थी, पालक हवालदिल झाले.

गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर आणि महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून प्रवेश निश्चिती केल्यानंतर अचानक ६५ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून त्यांचे प्रवेश रद्द झाल्याचे महाविद्यालयांकडून कळविण्यात आले. अकरावी प्रवेश प्रक्रियेत अनेक नामांकित महाविद्यालयांत प्रवेश फुल्ल झाले आहेत, तर अनेक महाविद्यालयांत ७५ टक्क्यांहून अधिक प्रवेश होऊन त्यांचे ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत. अशात ऐनवेळी अचानक प्रवेश रद्द झाल्याने आता प्रवेश कुठे मिळणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.

दरम्यान, मुंबई उपसंचालक कार्यालयाअंतर्गत ८४३ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली. तेथे असे काहीच घडले नाही. याच महाविद्यालयांमध्ये असे का घडले, असा प्रश्न उपस्थित करून योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी पालकांच्या वतीने स्वाती पाटील यांनी केली. यासंदर्भात त्यांनी उपसंचालक कार्यालयालाही पत्र लिहिले आहे. तर संमती पत्र हा प्रवेश प्रक्रियेचाच भाग आहे. वारंवार विद्यार्थ्यांना आठवण करूनही त्यांनी प्रवेश प्रक्रियेची ही पायरी वगळल्याने त्यांची प्रवेश प्रक्रिया अपूर्ण राहिल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले यांनी दिली.

छाननीअंती करणार पुढील कार्यवाहीया ६५ विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान नेमके काय झाले हे जाणून घेत आहोत. याबाबत योग्य ती छाननी करून पुढील कार्यवाही केली जाईल. - संदीप संगवे,उपसंचालक, मुंबई विभाग