Join us

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत ७६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:06 AM

अकरावी प्रवेश : २० हजारांहून अधिक मुलांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालयलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता ...

अकरावी प्रवेश : २० हजारांहून अधिक मुलांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून, २० हजार ३७१ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. त्यांना ९ डिसेंबरपर्यंत प्रवेशनिश्चिती करायची आहे.

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीसाठी कोटा वगळून एकूण १ लाख ४७ हजार ३३ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी तब्बल १ लाख ५८ हजार ८१० अर्ज सादर झाले. यातील ७,४३३ विद्यार्थ्यांना कला शाखेत, ४६ हजार ६०० विद्यार्थ्यांना वाणिज्य, २१,५८८ विद्यार्थ्यांना विज्ञान, तर ६१० विद्यार्थ्यांना एमसीव्हीसी शाखेत प्रवेश मिळालेत. प्रवेश मिळालेले सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्र राज्य मंडळाचे असून २,१४२ विद्यार्थी सीबीएसई तर २,५७२ विद्यार्थी आयसीएसई मंडळाचे आहेत. आयबी मंडळाच्या दाेनच विद्यार्थ्यांचा यात समावेश असून आयजीसीएसई मंडळाचे २३४ व एनआयओएस मंडळाचे ३६३ विद्यार्थी आहेत.

* पहिले पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांला प्रवेश बंधनकारक

पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले २०,३७१ विद्यार्थी असून यामध्ये वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे १०,९४४ विद्यार्थी आहेत. या पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवडलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर त्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यास घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास तशी विनंती संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयास करून प्रवेश रद्द करून घ्यावा लागेल. त्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल, अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.

शाखानिहाय मिळालेले प्रवेश असे

शाखा- एकूण जागा- अलॉटमेंट झालेले विद्यार्थी

(कोटा वगळून)

विज्ञान-४७,२०२-२१५८८

वाणिज्य -७९,१८२-४६,६००

कला-१७,४६४-७,४३३

एमसीव्हीसी -३,१८५-६१०

एकूण -१,४७,०३३- ७६,२३१

..............................

बोर्डनिहाय प्रवेश मिळालेले विद्यार्थी

एसएससी (७०,५३७), सीबीएसई (२१४२), आयसीएसई (२५७२), आयबी (२)