लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेताना वेगवेगळे झोन्स निश्चित करण्यात यावेत. रुग्ण दाखल करून घेण्यासाठी अॅडमिशन आणि डिस्चार्ज कमिटीची स्थापना करावी. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या झोन्समध्ये दाखल करावे, जेणेकरुन ३०-४० टक्के ऑक्सिजनची बचत होऊ शकेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची ऑक्सिजनच्या वापराविषयीची नियमावली राज्य शासनाने खासगी, शासकीय आणि पालिकास्तरावरील रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे.
राज्य शासनाने ऑक्सिजनच्या वापराविषयीच्या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ऑक्सिजनच्या वापराबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोना रुग्णांना लागणारे ऑक्सिजनचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. अशात ऑक्सिजनचा पुरवठा मागणीपेक्षा कमी असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यास अडचणी येत आहेत.
सध्या ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याविषयी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, राज्य शासनाकडून आलेल्या सूचनांविषयी शहर उपनगरातील रुग्णालयांना माहिती देण्यात आली आहे. या सूचनांमध्ये ऑक्सिजनचा साठा आणि वापराविषयीची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ही नियमावली सर्व आरोग्य संस्थांना कळविण्यात आली असून, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णालयांवर त्वरित कारवाई करण्यात येईल.