Join us

आयटीआयच्या तिसऱ्या फेरीत ५१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :आयटीआयच्या तिसऱ्या फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर झाली असून तिसऱ्या फेरीसाठी ५१ हजार ९१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

आयटीआयच्या तिसऱ्या फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर झाली असून तिसऱ्या फेरीसाठी ५१ हजार ९१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. यामधील ४३ हजार ९७४ प्रवेशाच्या जागा शासकीय तर ७ हजार ११७ प्रवेशाच्या जागा खासगी आयटीआयमधील आहेत. तिसऱ्या फेरीत प्रवेश अलॉट झालेले विद्यार्थी हे २७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

यंदा आयटीआय प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ३४.९७ टक्के तर दुसऱ्या फेरीमध्ये २५.५३ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. कमी वेळात कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम आणि स्वयंरोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी आयटीआय प्रवेशांकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. यंदा विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, कोरोना काळातील परिस्थितीनंतर यंदा आयटीआयला झालेली नोंदणी आणि होत असलेली प्रवेश निश्चिती दोन्हीमध्ये घट दिसून येत आहे. सद्यस्थितीत अकरावी प्रवेश आणि पॉलिटेक्निक प्रवेशही सुरू असल्याने विद्यार्थी द्विधा मन:स्थितीत असल्याने प्रवेश निश्चित होऊ शकत नसतील, अशी शक्यता काही प्राध्यापक वर्तवित आहेत. हळूहळू पुढच्या फेऱ्यांत प्रवेशनिश्चितीची संख्या वाढेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षी आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या शेवटी १ लाख ६ हजार ५३० प्रवेश निश्चित झाले होते आणि प्रवेशाची टक्केवारी ७१ टक्के इतकी होती. यंदा दुसऱ्या फेरीपर्यंत ३४ टक्के म्हणजेच ४९ हजार ८५३ प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशाची तिसरी, चौथी फेरी आणि समुपदेशन फेरी अद्याप बाकी असून प्रवेशात वाढ होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे शासकीय आयटीआयमधील जागांवर प्रवेशाची स्थिती चांगली असल्याचे प्रवेशाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

-----------

आयटीआय प्रवेशाची स्थिती

आयटीआय - शासकीय - खासगी - एकूण

एकूण संख्या - ४१७- ५५९- ९७६

कॅप जागा - ९२३११- ४०८०३- १३३११४

व्यवस्थापन जागा - ० - १३१४५- १३ १४५

एकूण क्षमता - ९२३११- ५३९४८- १४६२५९

पहिल्या फेरीतील प्रवेश - २४८४६- ७०८५- ३१९३१

दुसऱ्या फेरीतील अलॉटमेंट - ५३७५५- ८२३५- ६१९९०

तिसऱ्या फेरीतील अलॉटमेंट - ४३९७४-७११७-५१०९१