Join us  

प्रवेश अडले प्रमाणपत्रांविना, अकरावीच्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 7:02 AM

अनेक विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याने, उत्पन्नाचा दाखल नसल्याने त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. वारंवार हेलपाटे घालूनही वेळेत प्रमाणपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थी पालक हवालदिल झाले आहेत.  

मुंबई : इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीची निवड यादी बुधवारी जाहीर झाल्याने महाविद्यालयांत प्रवेश निश्चितीसाठी आता विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात विविध कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. मात्र अनेकांकडे प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याने गोंधळ उडाला आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याने, उत्पन्नाचा दाखल नसल्याने त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. वारंवार हेलपाटे घालूनही वेळेत प्रमाणपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थी पालक हवालदिल झाले आहेत.  प्रवेशप्रक्रियेदरम्यान राखीव प्रवर्गातून प्रवेश घेताना तसेच ईडब्ल्यूएस कोट्यातून प्रवेशाची निश्चिती करताना नॉन-क्रेमीलेअर, प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. अकरावी प्रवेशासाठी तर अनेक विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नसल्याने हमीपत्र लिहून देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी दि. २४ जून ही शेवटची तारीख असून, काही ठिकाणी तर ते ही स्वीकारले जात नसल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग, विद्यार्थी संघटनांकडे मात्र या तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. काही शाळांकडून शुल्क न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याच्याही तक्रारी आहेत.

तीन महिन्यांची मुदतवाढविद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर शैक्षणिक वर्ष २०२३- २४ च्या इयत्ता ११ वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र सादर करु न शकल्यास, विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरुन घेऊन प्रवेश देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्याना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३ महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी असे निर्देश शासनाकडून शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

टॅग्स :महाविद्यालयशिक्षण