व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश निकष शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 04:56 AM2020-10-10T04:56:42+5:302020-10-10T04:56:49+5:30
राज्य सरकारकडून राजपत्राद्वारे पात्रता निकष जाहीर
मुंबई : विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे निकष, पात्रता काय असावी, यासंदर्भात शुक्रवारी राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले. यामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, विधी, दृश्यकला अशा अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तर प्रवेशांमध्ये अधिक सुलभता येईल.
अनेक वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विशेषत: अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले होते. नव्या निर्णयानुसार, अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांत किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. यापूर्वी ही अट अनुक्रमे ५० व ४५ टक्के होती. याचप्रमाणे इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांत बारावीच्या किमान गुणांची अट ही ५० व ४५ टक्क्यांवरून अनुक्रमे ४५ व ४० टक्के केली आहे.
सकारात्मक निर्णय
निर्णय अतिशय सकारत्मक असून मागील काही वर्षांपासून ज्या काही जागा रिक्त राहत होत्या त्या आता राहणार नाहीत. या निर्णयामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी मिळेल. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचणार असून यामुळे विकासालाही गती मिळेल.
- अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय