डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात यंदाही प्रवेश शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 07:39 AM2023-04-01T07:39:37+5:302023-04-01T07:39:51+5:30
यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती
मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिलेल्या सवलतीनुसार बारावीमध्ये निवडलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात यंदाही थेट प्रवेश मिळणार आहे. एआयसीटीईच्या निर्देशानुसार ही सवलत २ वर्षांसाठी लागू असणार असून यंदा हे या संधीचे शेवटचे वर्ष आहे. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ व त्यापुढची प्रवेश हे एआयसीटीईच्या त्यावेळी केल्या जाणाऱ्या प्रवेश पात्रतेनुसार करण्यात येतील, असे तंत्रशिक्षण शिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या बारावीत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल, ॲग्रीकल्चर, अभियांत्रिकी ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, एंटरप्रीनरशिपपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रक्रिया
राज्यातील बारावी व्होकेशनल उत्तीर्ण विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षाकरीता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ही सवलत दिलेली आहे. त्यामुळे एआयसीटीईच्या प्रवेश मान्यता पुस्तिकेतील निर्देशांप्रमाणे राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे प्रभारी संचालक डॉ विनोद मोहितकार यांनी स्पष्ट केले.