लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश सत्र २०२१ साठीचे प्रवेश हे दहावीच्या गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलान प्रवेश प्रणालीतून करण्यात येणार आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डी. ए. दळवी यांनी दिली. शिवाय प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची सुविधा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. प्रमाणपत्रे तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही आयटीआय संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज लागणार नाही असे दळवी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यातील ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून सुमारे १ लाख जागा आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र २ संस्था व ४३ शासकीय औ.प्र.संस्थांमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी आश्रमशाळांचा समावेश आहे. शिवाय ५३८ खासगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५० हजार आहेत. सर्व प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. प्रवेशासंबंधी नियम, आवश्यक कागदपत्रांची माहिती व प्रवेश कार्यपध्दती पुस्तिका लवकरच संकेत स्थळावर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in वर या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे म्हटले आहे. राज्यातील अधिकाधिक उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने आवाहन केले आहे. तसेच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे संचालकांनी संगितले.
कोविडमुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय सर्वच मंडळांनी घेतला आहे. आयटीआयमधील जवळपास ८ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण तर ११ अभ्यासक्रमांसाठी १२ वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आहे. तसेच बहुतांश विद्यार्थी वर्ग हा ग्रामीण भागातील असल्याने सामाईक प्रवेश प्रवेशाचा पर्याय न ठेवता दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमानुसार सर्वाधिक गुणाधिक्याच्या आधारावर सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती संचालक दळवी यांनी दिली.