पसंतीचे महाविद्यालय मिळूनही ७८०७ विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:29 AM2018-07-13T06:29:12+5:302018-07-13T06:29:33+5:30
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत एकूण ३५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. मात्र त्यातील तब्बल ७८०७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाकडे पाठ फिरवली असून २१६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत.
मुंबई - अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत एकूण ३५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. मात्र त्यातील तब्बल ७८०७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाकडे पाठ फिरवली असून २१६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत. तसेच ७० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले असून २७ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. एकूणच पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही ८०९३ विद्यार्थ्यांचे प्रवेश त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयांत होऊ शकलेले
नाहीत. त्यामुळे या जागा पुढच्या फेरीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
अकरावी आॅनलाइनच्या पहिल्या फेरीत एकूण १ लाख २० हजार ५६६ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले. मात्र त्यातील केवळ ५० हजार ६२९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत तर तब्बल ६९ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी प्रवेशच न घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध असून ते दुसºया यादीची वाट पाहू शकतात.
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्याने बंधनानसुार तेथे प्रवेश न घेतल्यास तिसºया यादीनंतर महाविद्यालयातील रिक्त जागांवर त्याला प्रवेश मिळू शकतो, असे उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
का नाकारले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय?
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले बहुतांश विद्यार्थी हे दहावीनंतरच्या डिप्लोमा तसेच आयटीआय या अभ्यासक्रमांकडे वळले असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याचसोबत अनेकांनी आॅनलाइन प्रक्रियेतून बाहेर पडून मॅनेजमेंट, इनहाउस किंवा मायनॉरिटी कोट्यामध्ये प्रवेश मिळवले असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रवेश घेतलेले विद्यार्थी : ५०,६२९
पहिल्या पसंतीचे प्रवेश मिळालेले विद्यार्थी : ३५,८७५
प्रवेश न घेतलेले विद्यार्र्थी : ७,८०७
प्रवेश घेतलेले विद्यार्थी : २७,६९२
प्रवेश रद्द : ७०
प्रवेश नाकारले : २१६