पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:06 AM2021-04-04T04:06:03+5:302021-04-04T04:06:03+5:30
शालेय शिक्षणमंत्री; वर्गोन्नती संदर्भातील मार्गदर्शक सूचना शाळांना दोन दिवसांत मिळणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील काेरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या ...
शालेय शिक्षणमंत्री; वर्गोन्नती संदर्भातील मार्गदर्शक सूचना शाळांना दोन दिवसांत मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील काेरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करून माहिती दिली. खरे तर विद्यार्थ्यांचे वर्षभरातील शैक्षणिक मूल्यमापन करून त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यायला हवा, मात्र यंदा वाढता काेराेना संसर्ग व रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, शैक्षणिक संस्था बंद आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यावर काही अंशी शाळा उघडण्यात आल्या, मात्र पुन्हा वाढता संसर्ग लक्षात घेऊन त्या स्थानिक प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या. त्यामुळे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शिक्षण हे ऑनलाइन झाले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोनचा अभाव, शैक्षणिक सुविधांची कमतरता यामुळे अनेक विद्यार्थी या सुविधांचा लाभ घेऊ शकले नाहीत. या दृष्टीने यंदा या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाच्या आधारावर करायचे हा मोठा प्रश्न शाळा, शिक्षकांसमोर होता. शिवाय आता काेराेनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक पालक सुरक्षिततेच्या कारणास्तव मूळगावी परतू लागले आहेत. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना त्या देता येणार नसल्याची भीती हाेती.
येत्या २ ते ३ दिवसांत एससीईआरटीकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देताना म्हणजे दिली जाणारी वर्गोन्नती कशी असेल, अंतर्गत मूल्यमापन कसे होईल, त्यासाठी कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असेल? याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती एससीईआरटी संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.
* नववी, अकरावीसंदर्भात निर्णय लवकरच
नववीचे विद्यार्थी हे पुढच्या वर्षी दहावीला तर अकरावीचे विद्यार्थी पुढील वर्षी बारावीची महत्त्वाची परीक्षा देणार आहेत. त्यामुळे सध्याच्या वर्गातील त्यांचे मूल्यमापन महत्त्वाचे असल्याने यासंदर्भातील निर्णयही येत्या काही दिवसांतच शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
............................
.............................................