आता १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले; वैद्यकीय शिक्षण विभागासोबत चर्चेनंतर घेणार अंतिम निर्णय

By स्नेहा मोरे | Published: October 19, 2023 08:40 PM2023-10-19T20:40:22+5:302023-10-19T20:41:18+5:30

आता राज्य शासन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय या प्रवेशांविषयी काय निर्णय घेते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे.

admission of 141 students is stopped final decision will be taken after discussion with medical education department | आता १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले; वैद्यकीय शिक्षण विभागासोबत चर्चेनंतर घेणार अंतिम निर्णय

आता १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले; वैद्यकीय शिक्षण विभागासोबत चर्चेनंतर घेणार अंतिम निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींचा उल्लेख करत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील ऑफलाइन प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, या निर्णयामुळे आता थेट १४१ विद्यार्थ्यांना फटका बसणार असून आता प्रवेशाचे पुढे काय होणार असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता राज्य शासन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय या प्रवेशांविषयी काय निर्णय घेते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे.

नुकतेच वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने याविषयी हस्तक्षेप केला होता. परिणामी, यानंतर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसचे आॅफलाइन प्रवेश तातडीने रद्द करावे असाही निर्णय घेण्यात आला आहे. नीट परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतला होता. या प्रक्रियेतील चार फेऱ्यानंतर शिल्लक असलेल्या जागांवर आॅफलाइन प्रवेश घेण्याची मुभा राज्य सामायिक कक्षाने महाविद्यालयांनी दिली होती. परंतु, अचानक आलेल्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्णयामुळे या प्रक्रियेतील प्रवेश रद्द करण्याचा निर्णय समोर आला आहे.

राज्य सामायिक कक्षाने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात शिल्लक असलेल्या जागांकरिता इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना ई मेल करण्याचे आवाहन केले होते. ई मेलवरील अर्जाच्या गुणवत्तेवर प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार होती. मात्र आता ही प्रक्रिया रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. आता या प्रवेश प्रक्रियेच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

प्रवेश प्रक्रियेविषयी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी चर्चा व समन्वय साधून अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ देणार नाही, या पद्धतीने तोडगा काढण्यात येईल.
महेंद्र वारभुवन, आयुक्त , राज्य सामायिक कक्ष

प्रवेश मिळेल का ?

प्रवेश रखडलेल्या विद्यार्थ्यांना सध्या सीईटी कक्ष वा वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कोणत्याही माहितीची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वा गोंधळाचे वातावरण आहे. आता शिल्लक जागांवरील प्रवेश कसे होणार , उर्वरित १४१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही , या समस्येवर किती दिवसात तोडगा काढणार अशा विविध अडचणी विद्यार्थ्यांच्या समोर आहेत.

 

Web Title: admission of 141 students is stopped final decision will be taken after discussion with medical education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.