मुंबई विद्यापीठाच्या ९७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 09:45 IST2024-12-11T09:45:09+5:302024-12-11T09:45:22+5:30
प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर न केलेल्या कॉलेजांची यादी जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या ९७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या तब्बल ९७ हजार विद्यार्थ्यांची २०१९ पासूनची कागदपत्रे अद्यापही अनेक कॉलेजांनी विद्यापीठाकडे जमा केली नाहीत. त्या कॉलेजांची यादी विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केली असून, पुढील एका महिन्यात कागदपत्रे सादर केली नाहीत, तर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील, तसेच या कॉलेजांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे. त्यामुळे ९७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची भीती आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेबाबतची, तसेच त्यांची नाव नोंदणी आणि पात्रतेबाबतची कागदपत्रे कॉलेजांनी त्याच शैक्षणिक वर्षात विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक असते. मात्र, अनेक कॉलेजांकडून ही कागदपत्रे सादर करण्यात टाळाटाळ केली जात आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजेसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील आवश्यक कागदपत्रे ८ दिवसांत विहित शुल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन विद्यापीठाने गेल्या महिन्यात केले होते. ही मुदत संपल्यानंतर अनेक कॉलेजांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यातून विद्यापीठाने या कॉलेजांची यादी जाहीर केली आहे. या यादीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२२-२३ अशा चार वर्षांत कागदपत्रे सादर न केलेल्या कॉलेजांचा समावेश आहे. आता विद्यापीठाने या कॉलेजांना कागदपत्रे सादर करण्यासाठी पुन्हा एकदा एका महिन्याची मुदत दिली आहे.
या मुदतीत आवश्यक कागदपत्रे शुल्कासह विद्यापीठाकडे सादर करणार नाहीत त्या कॉलेजांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाणार असून, संबंधित कॉलेजांना पुढील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास परवानगी नाकारण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी कॉलेजांची असेल.
- डॉ. पूजा रौंदळे, संचालिका, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
विद्यार्थ्यांची कागदपत्रे सादर
न केलेल्या कॉलेजांची नावे
गुरु नानक खालसा कॉलेज, रुईया कॉलेज, अंजुमन ए इस्लाम कॉलेज, जय हिंद कॉलेज, अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट, एस. के. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, भवन्स कॉलेज, डी. जी. रुपारेल, विल्सन कॉलेज, कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन, सिद्धार्थ कॉलेज, सोफीया कॉलेज, रिझवी कॉलेज, आदी काही कॉलेजांचा समावेश आहे.