मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

By रेश्मा शिवडेकर | Published: May 15, 2024 04:42 PM2024-05-15T16:42:13+5:302024-05-15T16:43:14+5:30

विद्यापीठाच्या हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून हे ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातील.

Admission process for temple management course in Mumbai University will start from next month | मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

मुंबई-मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. विद्यापीठाच्या हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून हे ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातील. जून २०२४ पासून यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.

हिंदू अध्यासन केंद्र आणि टेम्पल कनेक्टने याबाबत सामंजस्य करार केला असून सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी, या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाता अभिप्रेत असलेली भारतीय ज्ञान परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना होईल त्याचबरोबर एका नवीन रोजगाराच्या संधीचे दालन खुले होऊ शकेल, अशी आशा वर्तवण्यात येत आहे.

याप्रसंगी मंदिर व्यवस्थापन प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष आणि साईबाबा संस्थान ट्र्स्ट शिर्डीचे माजी अध्यक्ष व ‘टेम्पल मॅनेजमेंट’ ग्रंथाचे लेखक डॉ. सुरेश हावरे, टेम्पल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य शेषाद्री चारी, डॉ. सचिन लढ्ढा, केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे व उपसंचालिका डॉ. माधवी नरसाळे उपस्थित होते.

अभ्यासक्रमात काय शिकवणार?

-भारतीय ज्ञान परंपरा, व्यवस्थापन शास्त्राची महत्वाची सूत्रे व तत्वे, स्थापत्य, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वित्त व्यवहार, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरण व परिसरपूरक विषय.

-तीन महिने मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील विविध मंदिरांमध्ये अनुभवाधारित प्रशिक्षण.

अभ्यासक्रमाच्या प्रतिसादावर याची व्याप्ती वाढवून ‘एमबीए इन टेम्पल मॅनेजमेंट’ असाही अभ्यासक्रम राबविण्याचा मानस आहे. आजमीतीस देशातल्या अनेक मंदिरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून सौर ऊर्जा निर्मिती, दानवस्तूंचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी आणि रांगांचे व्यवस्थापन अशा नाविन्यपूर्ण क्षेत्रातही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. प्रशिक्षित तरूणांना यामुळे रोजगार मिळू शकेल, असं कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले.

Web Title: Admission process for temple management course in Mumbai University will start from next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.