महापालिका शाळांत प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:57 AM2020-04-27T01:57:19+5:302020-04-27T01:57:31+5:30

प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या पालिका शिक्षण विभागाच्या आयसीएसई व सीबीएसई मंडळाच्या शाळांतील प्रवेशप्रक्रिया या लॉकडाउन काळातही आॅनलाइन पद्धतीने मार्गी लागण्याची शक्यता आहे.

Admission process in municipal schools online | महापालिका शाळांत प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन

महापालिका शाळांत प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन

googlenewsNext

मुंबई : महापालिकेच्या शाळांत सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्यात येत असून, त्यासंबंधित प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय पालिका शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. या प्रवेशप्रक्रियेची कार्यवाही आॅनलाइन होणार असून, लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यानंतर गुगल फॉर्म पालकांकडून भरून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या पालिका शिक्षण विभागाच्या आयसीएसई व सीबीएसई मंडळाच्या शाळांतील प्रवेशप्रक्रिया या लॉकडाउन काळातही आॅनलाइन पद्धतीने मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रायोगिक तत्त्वावरील पूनमनगर येथील सीबीएसई आणि वूलन मिल येथील आयसीएसई शाळा अनुक्रमे एप्रिल २०२० आणि जून २०२० पासून सुरू होणार होत्या. त्यासाठीची प्रवेश अर्जप्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरूही झाली. २६ मार्च ते २८ मार्चच्या दरम्यान प्रवेशप्रक्रियेसाठी सोडतीचे नियोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनातर्फे ही प्रवेशप्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. या प्रवेशप्रक्रियेची पुढील छाननी प्रक्रिया २७ एप्रिल २०२०पर्यंत पूर्ण करून पात्र-अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत.
३० एप्रिल रोजी मोठ्या स्क्रीनवर आॅनलाइन पद्धतीने पात्र-अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या जाहीर करून लॉटरी पद्धतीने निवडप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या वर्गासाठी / इयत्तेसाठी ३८हून अधिक अर्ज आले असतील त्याच इयत्तांसाठी ही निवडप्रक्रिया लॉटरी पद्धती राबविली जाणार आहे. १० मेपर्यंत पालकांना गुगल फॉर्म भरून आपल्या प्रवेशाची निश्चिती करायची आहे. याच कालावधीत ज्या इयत्तांसाठी लॉटरी पद्धत राबविण्यात आली नाही त्या पालकांकडूनही गुगल फॉर्म भरून प्रवेश निश्चिती करून घेतली जाणार आहे.
>सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार
लॉटरी पद्धती राबविली जाताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात यावे, अशा सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत. लॉटरी काढतेवेळी शाळांनी २ विद्यार्थी आणि २ पालक यांना उपस्थित राहण्याची विनंती करावी आणि त्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करावी, असेही निर्देशित
केले आहे.

Web Title: Admission process in municipal schools online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.