पॉलिटेक्निकच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:20+5:302021-07-01T04:06:20+5:30
विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत करता येणार नोंदणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहावीनंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता ...
विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत करता येणार नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीनंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया नोंदणी बुधवारपासून सुरू झाली असून, २३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नाेंदणी करता येईल. यादरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणीसह प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड करता येतील.
दरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशाेच्छुक विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. यासाठी संचालनालयाने प्रवेशाेच्छुक विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेण्यासाठी अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला होता.
दहावीच्या निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्याने ऑनलाइन अर्जामध्ये त्यांना केवळ बैठक क्रमांक नोंदवायचा आहे. २३ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. तर कागदपत्र तपासणीसाठी विद्यार्थ्यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत, यामध्ये सर्व सुविधा केंद्रांत येऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार अर्ज भरणे, कागदपत्र तपासणी, अर्ज निश्चिती आणि अंतिम गुणवत्ता यादी ही सर्व प्रक्रिया ३० दिवसांची असेल.
* छाननी आवश्यक
प्रवेशप्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष छाननी (स्क्रुटीनी) पद्धत निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व निर्बंधांचे पालन करीत सुविधा केंद्रावर सुरक्षित अंतर पाळायचे आहे. शिवाय सुविधा केंद्रावर एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या अर्जाची ई स्क्रुटीनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटीनी न केल्यास अशा उमेदवारांची नावे प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात येणाऱ्या कॅप आणि नॉन कॅप राऊंडच्या यादीमध्ये दिसणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
......................................................
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी
प्रवेश प्रक्रियेसाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून ८६९८७४२३६०, ८६९८७८१६६९ या क्रमांकांवर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी http://poly21.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन राज्य तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
...
असे असणार वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज भरणे ३० जून ते २३ जुलै
- कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती - ३० जून ते २३ जुलै
- तात्पुरती गुणवत्ता यादी - २६ जुलै
- गुणवत्ता यादीवरील आक्षेप - २७ ते २९ जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी - ३१ जुलै