रविवारीही प्रवेशाची लगबग
By admin | Published: June 19, 2017 03:23 AM2017-06-19T03:23:17+5:302017-06-19T03:23:17+5:30
दहावीच्या निकालावेळी विद्यार्थ्यांना ताण असला तरीही महाविद्यालयात जायचे याचा आनंदही असतो. पण विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेशाची चिंता लागून राहिली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या निकालावेळी विद्यार्थ्यांना ताण असला तरीही महाविद्यालयात जायचे याचा आनंदही असतो. पण विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेशाची चिंता लागून राहिली आहे. पहिल्या अर्जाच्या वेळी विद्यार्थ्यांना समस्या उद्भवल्या नसल्या तरीही दुसरा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी रविवारीही मुंबईतल्या काही शाळा सुरू होत्या. पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे काहीच विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले.
शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून अकरावी आॅनलाइनचा दुसरा टप्पा सुरू
झाला. दुसऱ्या अर्जात महाविद्यालयांचा क्रम, गुण आणि अन्य माहिती भरायची असते. पहिल्या टप्प्याला वेळ अधिक असल्याने विद्यार्थ्यांचा एकाच वेळी ओघ नव्हता. पण आता ओघ वाढल्याने सर्व्हर डाऊन होत आहे. गेल्या दोन दिवसांत विद्यार्थी आणि शाळांना काही प्रश्न उद्भवले होते. त्यामुळे आता सोमवारी तरी अर्ज नीट भरले जातील अशी शिक्षकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. दादरच्या बालमोहन विद्यालयाचे शिक्षक विलास परब यांनी सांगितले
की, शुक्रवारी दुपारी आॅनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली.
परंतु शुक्रवारी सायंकाळी आणि शनिवारी संकेतस्थळाचे सर्व्हर
डाऊन असल्याने विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज भरता आले
नाहीत. आम्ही विद्यार्थ्यांना सोमवारपासून अर्ज भरण्यासाठी शाळेत बोलावले
आहे. सर्व्हर सोमवारपासून नीट होईल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले की, यंदाची प्रक्रिया नवीन आहे. त्यामुळे थोडे प्रश्न उद्भवत आहेत. गेल्या वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळा सुरू असतानाच आॅनलाइन अर्जाविषयी प्रशिक्षण देण्यात येत होते. यंदा नवीन प्रक्रिया मुख्याध्यापक आणि शिक्षकांना एप्रिल-मे महिन्यात समजली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना नाही. शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षकच भरून देत आहेत. सर्व्हरचा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बोलावण्याचा विचार सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक बदललेले असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून शाळेत बोलावण्याचीही समस्या उद्भवत आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शाळा रविवारीसुद्धा सुरू होती. परंतु, रविवारी आॅनलाइन अर्जाच्या संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता आला नाही. अर्ज भरण्यासाठी सोमवारी पुन्हा शाळेत बोलावले आहे. अर्ज भरण्यासाठी शाळेतील शिक्षक मार्गदर्शन करत असल्यामुळे काही अडचण येत नाही.
- अपूर्वा बाक्रे, दादरआॅनलाइन अर्ज कसा भरायचा याबाबतची माहिती त्याचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांकडून मिळवली आहे. अर्ज भरण्यास सोमवारपासून शाळेत बोलावले आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून पंधरा महाविद्यालयांची यादी तयार केली आहे. अर्जात चूक झाली तर आवडत्या ठिकाणी प्रवेश घेताना अडचण निर्माण होईल. त्यामुळे थोडीशी भीती आहे.
- वैष्णवी भोसले, मानखुर्दआॅनलाइन प्रवेशाबद्दल काहीच माहिती नव्हती. शाळेतील शिक्षकांनी मला दुसऱ्या शाळेतून अर्ज भरण्यास सांगितले, पण तेथेही पदरी निराशाच पडली. दुसरा अर्ज कधी भरायचा याविषयीही योग्य ती माहिती मिळाली नाही. मी राहायला कुलाब्याला असून मला सीएसटी परिसरातील शाळेत आॅनलाइन फॉर्मच्या चौकशीसाठी पाठवले होते.
- वेद जैस्वाल, कुलाबा शिक्षकांनी आॅनलाइन फॉर्म भरून दिल्याने समस्या निर्माण झाली नाही. सर्व मुलांची माहिती शाळेच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होती. ती शिक्षकांनी आधीच भरून ठेवली होती. शाळेत फॉर्म भरण्यास मुलांना पुस्तक घेऊन बोलाविण्यात आले होते. पुस्तकातला कोड मुलांनी शिक्षकांना सांगितला. आता दुसरा फॉर्मही शिक्षक भरून देणार आहेत.
-माधुरी कुळ्ये, कांदिवलीपहिला आॅनलाइन प्रवेश अर्ज भरताना मुख्याध्यापकांची सही लागते, त्या वेळी जरा गडबड गोंधळ झाला होता. प्रवेश अर्ज भरताना ताईने मदत केली. पहिला फॉर्म शाळेमध्येच भरला. आता दुसरा फॉर्मसुद्धा सोमवारी शाळेमधूनच भरला जाणार आहे. दुसरा फॉर्म भरताना अडचणी तर येणार नाही ना, अशी भीती वाटते.
- ऋतुजा सावंत, एन.डी. भुता हायस्कूल, अंधेरीआॅनलाइन अर्ज कसा भरावा, त्यासाठी कोणत्या महाविद्यालयांची यादी करावी याबाबत शाळेत शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार अर्ज क्रमांक एक भरला आहे. अर्ज क्रमांक दोन भरण्यासाठी सोमवारी शाळेत बोलावले आहे. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे अर्ज स्वत: भरत आहेत.
- परशुराम कोळी, देवनार