देवनार डम्पिंग ग्राऊंडवर पाच वर्षांनंतर कचरावेचकांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:09 AM2021-08-29T04:09:04+5:302021-08-29T04:09:04+5:30
मुंबई - कचऱ्याला सतत लागणाऱ्या आगीच्या घटनेनंतर देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचरावेचकांना बंदी करण्यात आली होती. मात्र आता कचऱ्याचे वर्गीकरण ...
मुंबई - कचऱ्याला सतत लागणाऱ्या आगीच्या घटनेनंतर देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचरावेचकांना बंदी करण्यात आली होती. मात्र आता कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी तब्बल पाच वर्षांनी कचरावेचकांना डम्पिंग ग्राऊंडवर प्रवेश देण्यात येणार आहे. यापैकी ५० कचरावेचक देवनार डम्पिंग ग्राऊंडवर, तर २५ कचरावेचकांना महालक्ष्मी, कुर्ला, गोराई आणि वर्सोवा येथील कचरा संकलन केंद्रावर पाठविण्यात येणार आहे.
जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला सतत आग लागण्याच्या घटना घडत होत्या. यामुळे पालिकेच्या वतीने तत्काळ डम्पिंग ग्राऊंडला काँक्रीटचे कुंपण घालण्यात आले. तसेच येथे कचरावेचकांना प्रवेश नाकारून या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यानंतर कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करण्यासाठी येणाऱ्या कचरावेचकांना ओळखपत्र देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र त्यादृष्टीने कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत.
मात्र आता बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने महापालिका कचरावेचकांची निवड करून त्यांना देवनार डम्पिंग ग्राऊंडवर प्रवेश देणार आहे. यासाठी इच्छुक संघटनांकडून अभिरुची स्वारस्य मागवण्यात आले आहे. यामध्ये स्वारस्य दाखविणाऱ्या संघटनेला कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी पाठवण्याची जबाबदारी असेल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
* मुंबईत दररोज साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत असतो. सध्या विभागस्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते.
* सध्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
* दररोज सहाशे ते सातशे मेट्रिक टन घनकचरा देवनार डम्पिंग ग्राउंडवर पोहोचतो, तर ६०० मेट्रिक टन महालक्ष्मी आणि कुर्ला, ४०० मेट्रिक टन गोराई, ३०० मेट्रिक टन कचरा वर्सोवा संकलन केंद्रावर पाठवण्यात येतो.