Join us

ॲडमिशनचे ‘मिशन ऑगस्ट’, महिनाअखेरीस अकरावी सराव प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 6:24 AM

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी तातडीने अकरावी ऑनलाइन प्रवेशाची सराव प्रक्रिया सुरू करण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी तातडीने अकरावी ऑनलाइन प्रवेशाची सराव प्रक्रिया सुरू करण्यात येते. मात्र, यंदा या प्रक्रियेला काहीसा विलंब झाला आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी चालू महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी संकेतस्थळासह हेल्पलाइन सुरू करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

एप्रिलच्या अखेरीस पुण्यामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात बैठक पार पडली. त्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत अकरावीचे प्रवेश पूर्ण करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन असल्याचे समोर आले आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर महाविद्यालयांना जागा व तुकड्यांबाबत नोंदणीत बदल करण्याबाबतच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. त्याप्रमाणे यात महाविद्यालयांना ठरावीक मुदतीत उपलब्ध जागा, विषयांमध्ये बदल, तुकड्यांची संख्या यात बदल करण्यासाठी परवानगी असते.

या प्रक्रियेनंतर मे महिन्याच्या अखेरीस वा जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रियेचा अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करण्यात येईल. गेल्या वर्षी या प्रक्रियेला तब्बल पाच महिन्यांहून अधिक कालावधी लागला होता. दिवाळीच्या सुट्यानंतरही अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे आता मागील वर्षासारखी स्थिती टाळण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.