एल्गार परिषद; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमाप्रकरणी आरोपी असलेले स्टॅन स्वामी यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले.
नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून स्वामी यांना वांद्रे येथील होळी फॅमिली रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले.
स्वामी यांना ऑक्टोबर २०२०मध्ये रांची येथून अटक करण्यात आली. स्वामी यांचे वकील मिहीर देसाई यांनी शुक्रवारी न्यायालयाला सांगितले की, स्वामी वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार घेण्यास तयार आहेत. मात्र, त्यावर राज्य सरकार व केंद्र सरकारने आक्षेप घेतला. स्वामी यांना जे. जे. रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले तर सरकार त्याचा खर्च करणार नसल्याचे स्पष्ट केले.
मात्र, न्यायालयाने स्वामी यांचे म्हणणे मान्य करत त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली. परंतु, उपचाराचा खर्च त्यांनाच उचलावा लागेल, असे नमूद केले.
......................................