मुंबईत आजार रोखण्यासाठी ‘फोकाय’चा अवलंब; सर्वाधिक रुग्ण असलेल्या परिसरावर लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:04 AM2024-06-12T11:04:17+5:302024-06-12T11:07:20+5:30
पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया तसेच इतर जलजन्य आजार पसरू नयेत, यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
मुंबई : पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया तसेच इतर जलजन्य आजार पसरू नयेत, यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध स्तरांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदा पालिकेकडून विशेष लक्ष केंद्रित अर्थात ‘फोकाय’ पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक संख्येने आढळल्यास त्या विशिष्ट विभागांमध्ये ही पद्धती राबविण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रामार्फत देखील हे धोरण अवलंबिण्याच्या सूचना पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
झोपडपट्टी विभागात, गृहनिर्माण संस्था व चाळींमध्ये आदी ठिकाणी त्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. भित्तिपत्रके, फलक, हस्तपत्रिका, माहितीपट चित्रफीत आदींद्वारे जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काय आहे फोकाय पद्धत?
१) जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली) व पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत मलेरिया, डेंग्यू आणि जलजन्य आजार यांचे प्रतिबंधक नियंत्रण व उपाययोजना याबाबत विशेष लक्ष केंद्रित अर्थात ‘फोकाय’ आधारित उपचार आणि सूक्ष्म आराखडा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
२) जेथे एखाद्या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत, अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करतानाच अधिकाधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या विशिष्ट विभागात राबविण्याचे उद्दिष्ट या पद्धतीनुसार ठेवण्यात येते.
३) डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे, अशा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. तसेच मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे. यंदाच्या पावसाळ्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करतानाच आक्रमकपणे हा आराखडा राबवण्यात येणार आहे.
डासांची ४४ हजार उत्पत्ती स्थाने नष्ट कीटकनाशक विभागाने आतापर्यंत चार वेळा विभागनिहाय ‘एडिस’ डासाचे सर्वेक्षण केले आहे. त्यात ४४ हजार १२८ ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करण्यात आली आहेत. ज्या परिसरात नागरिक उघड्यावर झोपतात, अशा ठिकाणी विविध औषधे, मच्छरदाणी आदी गोष्टींचा वापर करण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येणार आहेत.