तुमच्या घरात येणारे तूप भेसळीचे नाही ना?, गणेशोत्सवापूर्वी ७ लाखांचे तूप जप्त; काय आहे धोका? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:40 AM2022-08-24T09:40:59+5:302022-08-24T09:42:03+5:30
गौरी-गणपतीमध्ये विविध पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तूप वापरणार असाल, तर सावध राहा.
मुंबई-
गौरी-गणपतीमध्ये विविध पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तूप वापरणार असाल, तर सावध राहा. कारण, मानवी आरोग्यास धोकादायक वनस्पती तूपाची विक्री करणारी टोळी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पकडली आहे. घाऊक व्यापाऱ्यांकडून एकूण सात लाख ३८ हजार ४९७ रुपये किमतीचे तूप जप्त करण्यात आले.
बेकरीची नियमित तपासणी करताना तेथे वापरण्यात येणाऱ्या वनस्पती तुपाचे नमुने घेण्यात आले. पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाली. त्यातून हे तूप वनस्पती तूप मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले, अशी माहिती एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी दिली.
प्रयोगशाळेने सोमवारी हा तपासणी अहवाल पाठविला. त्यानंतर तातडीने आरोग्यास अपायकारक वनस्पती तुपावर कारवाई करण्यात आली. त्यासाठी या तुपाचे घाऊक विक्रेते आणि वितरक यांच्याकडील तुपाचा साठा जप्त करण्यात आला.
मार्केट यार्डमधील घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन तेथील तुपाचे पफ वनस्पती नमुने घेण्यात आले. तसेच एक हजार २८८ किलो तुपाचा तीन लाख ५२९ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सेंच्युरी पफचा चार लाख ३८ हजार ९६६ रुपयांचा साठा जप्त केला. त्यानंतर वितरकांकडूनही तीन लाख १९ हजार ८८५ रुपयांचे तूप जप्त केले.
हे वनस्पती तूप तमिळनाडूमधून पुण्यात आणले होते. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण माहिती त्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे धोका
- वनस्पती तुपातील ट्रान्स फॅटचे प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत असावे, असे कायद्याने निश्चित केले आहे.
- पण, प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात हे प्रमाण सहा टक्क्यांपर्यंत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्याचा थेट धोका मानवी आरोग्यस आहे.
- वनस्पती तुपामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.