मनोहर कुंभेजकर, मुंबई-भारतीय जनता पार्टीच्या मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चेतन पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
ॲड. चेतन पाटील यांनी गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात भाजपा मच्छीमार सेलच्या माध्यमातून राज्यातील मच्छीमार बांधवांच्या उन्नती व उत्कर्षाकरीता अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा विधानपरिषद आमदार रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी गेल्या तीन वर्षांत मच्छीमार सेलच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी मासे विक्रेत्या महिलांना अधिकृत परवाने, मार्केटमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करणे, केंद्र शासनाच्या मत्स्यसंपदा योजनेतून १.२० कोटींच्या बोटी मंजूर करणे, फिश ऑन व्हीलच्या गाड्या, मच्छी विक्रेत्या महिलांना शासनाच्या योजनेतून शीतपेट्या देणे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे निवारा शेड बांधण्यात आले. तसेच क्यार, निसर्ग, तौक्ते चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना शीतपेटी, जाळी, घरांसाठी पत्रे व आर्थिक मदत करण्यात आली. मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून मच्छीमारांच्या नावे सातबारा/प्रॉपर्टी कार्ड करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. राज्यातील मच्छीमार बांधवांच्या विकासाकरिता केलेल्या याच कामांची दखल घेऊन पक्षाने त्यांची मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे.
या निवडीनंतर बोलताना ॲड. चेतन पाटील यांनी मच्छीमार सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये मच्छीमार सेलच्या माध्यमातून राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी केलेल्या कामामुळे पक्षाने फेरनियुक्ती केली आहे. पुढील काळात मच्छीमार बांधवांसाठी ताकदीने काम करून पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्याची जबाबदारी वाढली असल्याचे सांगून राज्यातील सागरी व भूजलाशयीन जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्न शासन स्तरावर सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.