Join us

मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपातर्फे अॅड. अमित महेता यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 2:33 PM

शिवसेनेने बोरिवली आणि दहिसरचे विभाग क्रमांक 1चे विभागप्रमुख विलास उर्फ भाई पोतनीस यांना नुकतीच मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहिर केली असतानाच आता भाजपाने देखील या निवडणुकीत आपला उमेदवार शिवसेनेसमोर उभा केला आहे.

मुंबई : शिवसेनेने बोरिवली आणि दहिसरचे विभाग क्रमांक 1 चे विभागप्रमुख विलास उर्फ भाई पोतनीस यांना नुकतीच मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली असतानाच आता भाजपाने देखील या निवडणुकीत आपला उमेदवार शिवसेनेसमोर उभा केला आहे. त्यामुळे 70 वर्षीय अनुभवी सेनेचे विलास पोतनीस यांच्या विरोधात भाजपाचे उच्च शिक्षित अॅड. अमित मेहता अशी सेना विरुद्ध भाजपात मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक रंगणार आहे.भाजपाने मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष आणि गोरेगावचे रहिवासी अॅड. अमित मेहता यांना आज उमेदवारी जाहीर केली आहे. ग्राहक संरक्षण सेलचे प्रमुख म्‍हणून ते कार्यरत आहेत. मेहता यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचे हक्‍क, ग्राहक संरक्षण आणि भाडेकरून हक्‍कासाठी न्‍यायालयीन संघर्ष करणारा कार्यकर्ता म्‍हणून अॅड. अमित महेता यांची ओळख आहे.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे यांच्‍या आदेशाप्रमाणे मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी अॅड. महेता यांची उमेदवारी आज जाहीर केली असून, आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाचा तरुण उच्चशिक्षित सक्रिय कार्यकर्ता अशी त्‍यांचे ओळख आहे. अॅड. अमित महेता यांचे शिक्षण इंजिनीअरिंग, एमबीए, कायद्याची पदवी (एलएलबी) असे असून एक उच्च शिक्षित तरुण चेहरा भाजपाने या निवडणुकीत उभा केला आहे.

टॅग्स :भाजपा