अॅड. पल्लवी पुरकायस्थ हत्याकांड : पसार होण्यासाठीच सज्जादने घेतला पॅरोलचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:02 AM2017-10-12T03:02:07+5:302017-10-12T03:02:33+5:30
अॅड. पल्लवी पुरकायस्थ हत्याकांडातील दोषी सज्जाद मुगलने पळण्याच्या उद्देशानेच पॅरोलचा आधार घेतल्याची माहिती तपासातून उघड झाली.
मुंबई : अॅड. पल्लवी पुरकायस्थ हत्याकांडातील दोषी सज्जाद मुगलने पळण्याच्या उद्देशानेच पॅरोलचा आधार घेतल्याची माहिती तपासातून उघड झाली. १५ ते १६ वर्षांची शिक्षा असती तर ती भोगली असती, मात्र मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे त्याने पॅरोलचा आधार घेत पळ काढल्याची माहिती त्याच्या चौकशीतून उघड झाली. त्यानुसार गुन्हे शाखेने सहा महिन्यांच्या शोधमोहिमेनंतर काश्मिरी खोºयातून शिताफीने सज्जादला बेड्या ठोकल्या. बुधवारी त्याचा ताबा नाशिक पोलिसांकडे देण्यात आला़
वडाळ्याच्या राहत्या घरी २०१२मध्ये सज्जादने क्रूरपणे पल्लवीची हत्या केली होती. या गुन्ह्यात २०१४मध्ये त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. फेब्रुवारी २०१६मध्ये मुगल पॅरोलवर नाशिक कारागृहातून बाहेर पडला. त्याला २७ मे रोजी कारागृहात परतणे बंधनकारक होते. मात्र तो पसार झाला. जुलै महिन्यात याबाबत वृत्तपत्रातून गुन्हे शाखेला माहिती मिळाली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. निकम यांच्या पथकाने सुरुवातीला कारागृहातील कैद्यांच्या मार्फत त्यांचे खबरी तयार केले. त्यात काही महिने गेले. मुगलला ज्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले होते त्या बरॅकमधील कैद्यांसोबत खबरी कैद्यांचा संवाद वाढविला. तेव्हा त्यांच्याच चौकशीतून मुगलने पळण्याच्या उद्देशानेच पॅरोलचा आधार घेतल्याची माहिती मिळाली. तो पुन्हा येणार नसल्याचेही त्यांना समजले.
सज्जाद त्याच्या गावी सलामाबाद येथे असल्याची माहिती त्यांना होती. यापूर्वी नाशिक पोलिसांनी दोन वेळा सज्जादला आणण्याचा प्रयत्न केला. काश्मिरी म्हणून आपल्याला चुकीच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याची माहिती सज्जादने तेथील रहिवाशांना देत त्यांची सहानुभूती मिळवली. त्यामुळे तेथील रहिवाशांनी नाशिक पोलिसांना बेदम मारहाण केली होती. त्या हल्ल्यात पथक थोडक्यात बचावले होते. अशा परिस्थितीत सज्जादला आणणे मोठ्या धैर्याचे काम होते. पाकिस्तानी सीमेलगत, प्रवेशबंदी भाग, त्यात पोलिसांबद्दलचा असलेला रोष यातून निकम यांच्या पथकाने सुरुवातीला पर्यटक म्हणून तेथे जाण्याचा विचार केला. सुरुवातीचे पाच ते सहा महिने त्यांनी तेथील भौगोलिक अभ्यास केला. काश्मिरी पेहेरावापासून, त्यांची वागणूक, राहणीमानाचा अभ्यास केला. काही दिवस तेथील ठरावीक ठिकाणी वास्तव्य केले. आपण कुठे कमी पडतोय याचा अभ्यास केला. फेरन कपडे घालून तेथे सराव केला.