Join us

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत प्रकाश आंबेडकरांचे गंभीर विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 8:24 PM

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवल्यानंतर त्यांच्या जोरदार टीका होऊ लागली.

मुंबई  - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. तर, महाविकास आघाडीत येण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबच्या कबरीवर जाऊन डोके टेकवले होते. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक होऊन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर, उद्धव ठाकरेंनाही भाजपकडून प्रश्न विचारण्यात आले. आता, प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजीमहाराज यांच्या हत्येबद्दल गंभीर विधान केलं आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर चर्चेत आले आहेत. 

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवल्यानंतर त्यांच्या जोरदार टीका होऊ लागली. सोशल मीडियातूनही त्यांच्या या कृतीला अनेकांनी विरोध दर्शवला. औरंगजेबाच्या कबरीवरील भेटीचं प्रकाश आंबेडकरांनी आज पुन्हा एकदा समर्थन केलंय. ''राजा म्हणून ५४ वर्ष औरंगजेबाने राज्य केलं आहे. त्याने सुफी परंपरा जपली आणि तशा त्याला चांगल्या आणि वाईट बाजू आहेत. चांगल्या बाजूचं गुणगाण गायलं पाहिजे वाईट बाजू सोडल्या पाहिजेत. मुस्लिमांचा कडवटपणा, हिंदूचा कडवटपणा उभं करणं चालंलं आहे ते थांबलं पाहिजे,'' असं आंबेडकरांनी म्हटलं. यावेळी, छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबद्दलही त्यांनी भाष्य केलं. 

औरंगजेबाच्या सल्लागार समितीमध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे, आबा भटजी नावाची असणारी व्यक्ती, ज्याचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी, असा इतिहासात उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख करताना, त्यांनी असं म्हटलंय की, मनुस्मृतीप्रमाणे त्यांना शिक्षा देण्यात यावी. असा सल्ला या भटजींनी दिला. तोच सल्ला अमलांत आणला, असा आरोप असल्याचे मी मानतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. दरम्यान, आपण औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली म्हणून दंगल झाली नाही, असा दावाही त्यांनी केलाय. 

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली आहेत. याचं कारणं जे चुकीचा समज तयार केला जातो आहे, तसेच हिंदू-मुस्लिम दंगली करण्याचा जो बेत होता, तो मला थांबवायचा होता. माझ्या त्या प्रयत्नाला यश आलं असं मी म्हणतो आणि औरंगजेबाच्या नावाने जी दंगल होणार आहे ती थांबली आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच, यापूर्वी देखील बरेच राजकीय नेते औरंगजेबाच्या कबरीवर गेले आहेत, असेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. 

टॅग्स :प्रकाश आंबेडकरसंभाजी राजे छत्रपतीऔरंगाबादवंचित बहुजन आघाडी