लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आप्पासाहेबांच्या पुण्यतिथीदिनी गिरगावातील चौकाला त्यांचे नाव देण्याचा सोहळा पार पडतोय, ही मोठी गोष्ट आहे. त्यातूनच आप्पासाहेबांचे नाव नव्या पिढीला प्रेरणा देईल, असे उद्गार ‘लोकमत समूहा’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांनी काढले. त्यांच्या हस्ते बुधवारी गिरगावातील नवलकर लेन येथील चौकाला मराठा महासंघाचे नेते कै. ॲड. शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांचे नाव देण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुलभा पवार, योगेश पवार, वीरेंद्र पवार, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार भाई जगताप, अ. भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप, वसंतराव बेडेकर, डॉ. प्रताप मुळगावकर, मुंबई महापालिकेच्या ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघाडे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
आप्पासाहेबांच्या आठवणींना उजाळा
डॉ. विजय दर्डा यांनी भाषणात आप्पासाहेबांच्या आठवणींना उजाळा देतानाच त्यांच्या कार्याचा पटही उलगडून दाखवला. मराठा महासंघाचे अध्यक्ष या नात्याने आप्पासाहेबांनी तब्बल ३० वर्षे राज्याच्या कानाकोपऱ्यात नेतृत्व केले. मराठा समाजासाठी काम करताना त्यांनी अन्य समाजाच्या भावना दुखावतील, अशी भूमिका कधीही घेतली नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतरप्रकरणी त्यांनी घेतलेली समन्वयाची भूमिका हे त्याचेच द्योतक होते, याचा डॉ. विजय दर्डा यांनी आवर्जून उल्लेख केला.
मराठा समाजातील तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न धावता उद्योग निर्माण करावे आणि त्यातून इतरांना रोजगार द्यावा, अशी त्यांची भूमिका होती. त्यातूनच त्यांनी नवा विचार, नव्या योजना दिल्या. त्यांची सामाजिक बांधिलकी मजबूत आणि सर्वसमावेशक होती. त्या माध्यमातून त्यांनी वैचारिक व्यासपीठ निर्माण केले, असे डॉ. दर्डा म्हणाले.
माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील आणि आप्पासाहेब यांच्यातील नात्यालाही त्यांनी उजाळा दिला. तर, प्रेमळ आणि गरजूंना मदत करणारा माणूस , लढाऊ नेता, अशी आप्पासाहेबांची ओळख होती. आज चौकाला त्यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमास जमलेली गर्दी हे त्यांच्यावरील प्रेमाचे प्रतीक असून, आप्पासाहेबांपासून प्रेरणा घेऊन आपण सामाजिक कार्यात पुढे जाऊ, असे मनोगत लोढा यांनी व्यक्त केले.