Join us  

भाजपाने निकालाआधीच पराभव स्वीकारला?; चंद्रकांत पाटलांकडून अनिल परबांना पेढा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:59 PM

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत अनिल परब यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Chandrakant Patil : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं. गेल्या ३० वर्षापासून या जागेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत झाली. त्यानंतर आता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महत्त्वाची घडामोड घडल्याचे पाहायला मिळालं. विधानभवनात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचे केलेले अभिनंदन हे  मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दुसरीकडे निकालाआधीच भाजपने पराभव मान्य केला आहे का असाही सवाल चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर विचारला जात आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी विधानभवात एक वेगळेचे चित्र पाहायला मिळाले. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी अंबादास दानवे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि अनिल परब देखील होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. मात्र त्यानंतर पाटील यांनी अनिल परब यांच्यासोबत संवाद साधताना महत्त्वाचे विधान केले.

अंबादास दानवेच्या कार्यालयात येताच चंद्रकांत पाटील यांना मोठे चॉकलेट दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. यानंतर अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत आमचे ३१ खासदार निवडून आले म्हणून आम्ही पुढे वाटत आहोत असे म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यापुढे पेढ्याचा बॉक्स धरला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पेढा अनिल परब यांना दिला आणि मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो, असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या.

मात्र आता अनिल परब यांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडे मुंबई पदवीधर निवडणुकीच्या नरजेतून पाहिलं जात आहे. या निवडणुकीचा निकाल पुढील महिन्यात जाहीर होणार असला तरी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याचे म्हटलं जात आहे.

टॅग्स :विधानसभाअनिल परबउद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलअंबादास दानवे